सातारा : स्वच्छ भारत अभियान व घनकचरा व्यवस्थापन उपक्रम जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायती, नगरपंचायती, पालिकांनी मिशन मोडवर राबवावा. त्यासाठी कृती आराखडा करावा, असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेच्या यंत्रणा, पालिकांची आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद उपस्थित होते.
कराड आणि पाचगणी या नगरपालिकांना स्वच्छतेसाठी राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. असे असले तरी जिल्ह्यात इतरत्र स्वच्छतेच्याबाबतीत आपण बरेच मागे आहोत, असे सांगून देसाई म्हणाले, की अनेक बाजारपेठा व व्यवसाय बंद झाल्यावर रात्री कचरा रस्त्याच्या कडेला आणून टाकला जातो. हे चित्र अत्यंत वाईट आहे. हे बदलण्यासाठी आणि एकूणच जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छ भारत अभियान जिल्ह्यात मिशनमोडवर राबविण्याबाबत देसाई यांनी गट विकास अधिकारी व पालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
छोट्या ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प स्वतंत्र राबविणे शक्य नसल्यास २०ते २५ गावे यांना एकत्र आणून असे प्रकल्प उभारावेत व चालवावेत. त्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्याव्यात. जेथे समाधानकारक काम होणार नाही, अशा यंत्रणानी संबंधितावर कठोर करवाईचे निर्देशही त्यांनी दिले.
पाटणकरांचे बोलणे नैराश्यातून
सत्यजित पाटणकर यांनी आता मोठ्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांना धक्का बसला त्यातून ते सावरले नसल्यानेच असे नैराश्यातून बोलत आहेत. ते असेच बोलत राहिले तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांची आणखी वाईट स्थिती होईल, दिवंगत शिवाजीराव देसाई यांचा पुतळा आणि स्मारकासाठी शासनाचा एकही रुपया निधी घेतला नसल्याचे देसाई यांनी सांगितले.