पालिका घरकुल घोटाळ्यात जिल्ह्य़ाचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादीचे नेते आ. गुलाब देवकर यांना  मंगळवारी अटक झाली. अटकेनंतर लगेचच त्यांची धुळे कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने शरण येण्यासाठी दिलेली मुदत संपण्याच्या अगदी काही तास आधी देवकर शहर पोलीस ठाण्यात उपस्थित झाले.
देवकरांवर फौजदारी स्वरुपाचा कट तसेच बनावट कागदपत्रे तयार करून विश्वासघात करणे, शासकीय पैशांचा गैरवापर अर्थात भ्रष्टाचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. १६ मे २०१२ रोजी देवकर यांना नोटीस देण्यात येऊन १९ मे २०१२ रोजी त्यांना पोलिसात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पण त्या दिवशी अटक टाळली आणि २१ मे २०१२ रोजी ते पोलिसात हजर झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष न्यायालयात त्यांना त्याच दिवशी उपस्थित करण्यात आले असता त्यांच्यासह इतरांनाही जामीन देण्यात आल्यामुळे देवकरांचा कारावास टळला होता. त्यानंतर प्रेमानंद जाधवसह इतर काही नागरिकांनी त्यांच्या जामिनाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले. सहा ऑगस्ट २०१२ रोजी त्यांचा जामीन रद्द करण्यात आल्यावर देवकर यांनी ताबडतोब सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने खंडपीटाच्या निर्णयास स्थगिती दिली. मात्र या निर्णयासही काही नागरिकांनी आव्हान दिले. १७ डिसेंबर रोजी न्यायालयाने खंडपीठाचा निर्णय कायम ठेवून दोन आठवडय़ात देवकर यांना पोलिसात हजर होण्याचे आदेश दिले होते.