हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याच्या विचारात

मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याबाबत नेतृत्वाला विनंती केली असल्याची चर्चा आहे.

Hasan Mushrif

अकोले :  हसन मुश्रीफ जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याच्या विचारात आहेत. आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी त्यास अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला.भाजप सूडाचे राजकारण करीत असल्याची टीका करताना त्यांनी महाविकास आघाडी अभेद्य असल्याचे सांगितले. महाविकास आघाडी पुढेही टिकणार असल्याचे सांगताना स्थानिक संस्थांच्या निवडणुका आघाडी म्हणून लढविल्या जातील असे ते म्हणाले. मुश्रीफ आज अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर होते.त्यांच्या हस्ते तालुक्यातील तसेच अकोले शहरातील  विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.पंचायत समिती सभागृहात त्यांनी तालुक्यातील करोना संदर्भात आढावा बैठकही घेतली.

मुश्रीफ यांनी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडण्याबाबत नेतृत्वाला विनंती केली असल्याची चर्चा आहे. त्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, की नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यात आगामी काळात एकाच वेळी विधानपरिषद निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था,सहकारी संस्था यांच्या अनेक निवडणुका आहेत. एक मंत्री अशा स्थितीत दोन जिल्ह्यांकडे कसे लक्ष देणार? स्वत:चा जिल्हा म्हणून मला कोल्हापूर कडेही अशावेळी लक्ष देणे आवश्यक आहे. त्या मुळे मी तशी विनंती केली आहे असे सांगत पालकमंत्रीपद सोडण्याचे वृत्तास त्यांनी दुजोरा दिला.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात शंभर कोटी रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.त्यांना त्या बाबत नोटीस पाठविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महाविकास आघाडी सोडणार असल्याची चर्चा आहे. या बाबत त्याची प्रतिक्रिया विचारता, ते त्यांनाच विचारा असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र  क्षीरसागर यांनी जिल्हा व तालुक्यातील करोना स्थितीची माहिती दिली. जिल्ह्यात सध्या एकूण १ हजार ७६४ क्रियाशील रुग्ण आहेत,त्यात अकोले तालुक्यातील ८४ रुग्णांचा समावेश आहे.अकोले तालुक्यात आजपर्यंत करोनामुळे १७४ जणांचा मृत्यू झाला आहे.तालुक्यात एकूण २ लाख १३ हजार  लसीकरण झाले आहे.त्यात १ लाख ५८ हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे तर ५४ हजार ७६० जणांनी दोन्हीही डोस घेतले आहेत. तिसरी लाट येऊ नये म्हणून जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज ना.मुश्रीफ यांनी या वेळी व्यक्त केली. जिल्हा नियोजनातून ५१० कोटी रुपयांपैकी १५३ कोटी रुपयांची तरतूद कोविडसाठी करण्यात आली आहे.त्यातील १०० कोटी रुपये आत्तापर्यंत खर्च करण्यात आले असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढेल अर्थात काही ठिकाणी त्याला अपवादही असेल असेही ते म्हणाले.

या वेळी आ.डॉ. किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष  सीताराम गायकर,ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे,पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,जिल्हा उपाध्यक्ष सुरेश खांडगे उपस्थित होते. अकोले येथील उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव अनेक दिवसांपासून पडून आहे. या बाबत पत्रकारांनी विचारले असता  मुश्रीफ म्हणाले, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी याबाबत मागणी केली आहे असे सांगताना, हा प्रश्न तुम्ही ४० वर्षे सत्तेत असलेल्यांना विचारायला हवा होता, असे म्हणत मुश्रीफ यांनी नाव न घेता मधुकरराव पिचड यांना टोला लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Hasan mushrif to step down as guardian minister of ahmednagar district zws

ताज्या बातम्या