सावंतवाडी : आमदार नितेश राणे यांच्या नियमित जामीन अर्जावर सोमवार दि.३१ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने तसा निर्णय दिला आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्या नंतर आज भाजपाचे आमदार नितेश राणे हे जिल्हा न्यायालयात स्वत: हजर झाले. सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांत शरणागती पत्करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार श्री.राणे जिल्हा न्यायालयात दाखल झाले. याचवेळी त्यांनी नियमित जामिनासाठी पुन्हा अर्ज दाखल केला आहे.

कणकवली शहरातील नरडवे फाटा येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याचा कट रचणे व कटात सामील असल्याच्या संशयावरून कणकवली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमदार राणे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्यात आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा अर्ज फेटाळताच सर्वोच्य न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. गुरुवारी याच्यावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळला. तसेच दहा दिवसांत शरणागती पत्करा व जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज करा, असे आदेश दिले होते.

आमदार राणे यांनी आज जिल्हा न्यायालयात दाखल होत नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे यांच्यासह भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अर्जावर जिल्हा सत्र न्यायाधीश आर बी रोटे यांच्या न्यायालयात प्राथमिक सुनावणी होत न्यायालयाने याबाबत सोमवार दि. ३१ जानेवारी रोजी सुनावणीसाठी तारीख नेमली आहे.