कराड : कोयना पाणलोटात वार्षिक सरासरीच्या निम्याहून अधिक पाऊस झाला आहे. तर, पाणलोटात सलग सहा दिवस ओढ घेतलेल्या पावसाने काल मंगळवारी रात्रीपासून जोर धरला आहे. त्यामुळे धरणाच्या सहा वक्री दरवाजातून जलविसर्ग वाढवण्यात येणार असून, ३१ जुलैपर्यंत धरणसाठा ७७ टीएमसी (अब्ज घनफूट) एवढा नियंत्रित ठेवला जाणार असल्याचे कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता महेश रासनकर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

पश्चिम घाटक्षेत्रात अगदीच ओसरलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने खरिपाच्या पेरण्या पुन्हा अडचणीत आल्या असून, पेरणी झालेल्या क्षेत्रावरील उगवणीवर या पावसाचा परिणाम होणार आहे. सध्या पश्चिम घाटक्षेत्रात मध्यम ते जोरदार पाऊस कोसळत असल्याचे चित्र आहे.

कोयना धरणक्षेत्रात सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर जोरदार पाऊस सुरु झाला आहे. कोयना धरणक्षेत्रात यंदा आजवर वार्षिक सरासरीच्या निम्यांहून अधिक म्हणजेच २,५७२ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ५१.४४ टक्के) पावसाची नोंद झाली आहे. सध्या कोयनेचा जलसाठा नियंत्रणासाठी धरणाचे सहा वक्री दरवाजे तीन फुटांवर ‘जैसे थे’ ठेवून दरवाजे व पायथा वीजगृहातून एकूण ११,४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. दुसरीकडे धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ३,७७५ क्युसेकने (घनफूट) वाढून ती १२,२४५ क्युसेक झाली आहे. त्यामुळे आवक पाण्यापेक्षा विसर्ग कमी राहिल्याने ७७ टीएमसी पाणीसाठा नियंत्रित राखण्यासाठी धरणाच्या दरवाजातून जलविसर्ग वाढवला जाणार आहे.

कोयना पाणलोटात आज बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत गेल्या २४ तासात ९७.३४ मिमी. पावसाची नोंद होताना, १५ टीएमसीने (अब्ज घनफूट) वाढून ७६.४४ टीएमसी (धरण क्षमतेच्या ७२.६२ टक्के) झाला आहे. आज बुधवारी दिवसभरात कोयना पाणलोटक्षेत्रात महाबळेश्वरला ६३, नवजाला ६१ तर, कोयनानगरला ३२ मिमी. तर, कुंभी धरण ७४ मिमी, कडवी २१, धोम-बलकवडी १९, दूधगंगा ११, धोम १०, वारणा, तारळी ७ मिमी. असा धरणांच्या परिसरातील पाऊस आहे. तसेच अन्यत्र, प्रतापगडला ७७ मिमी, पाथरपुंज ५६, दाजीपुर ४९ तर, पडसाली व रेवाचीवाडी येथे ३९ मिमी. पावसाची नोंद आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खरीप पेरण्या अडचणीत

मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा आणि जोरदार कोसळलेल्या मोसमी पावसामुळे शेतशिवारं अति पावसामुळे पेरणीयोग्य न राहिल्याने एकंदरच खरीप हंगाम अडचणीत असल्याचे चित्र होते. अशातच गेल्या पाच- सहा दिवसात पावसाचा जोर ओसरल्याने शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला. परंतु, पावसाने पुन्हा जोर धरल्याने आता पाऊस नको- नको म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.