उपराजधानीत शनिवारी तब्बल अर्धा एक तास पावसाने शहरात ठाण मांडले होते. त्यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले होते. चंद्रपूर जिल्ह्य़ात शुक्रवारी रात्री किमान अर्धा तास पावसाने ठाण मांडले होते. विदर्भातील अनेक भागांतही पावसाने हजेरी लावली होती.
मराठवाडय़ात सरी
मराठवाडय़ास मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा कायम असली, तरी मान्सूनपूर्व जोरदार सरींनी मात्र मान्सूनच्या दमदार कामगिरीची चाहूल दिली आहे.  औरंगाबाद, बीड, लातूर, जालना आदी सर्वच जिल्ह्य़ांत शनिवारी थोडय़ा-फार फरकाने दमदार मान्सूनपूर्व सरी कोसळल्या.
नाशिकमध्ये एक जण ठार
नाशिक जिल्ह्यातील काही भागात शनिवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. नांदगाव तालुक्यातील वेहळगाव येथे वीज पडून युवकाचा मृत्यू झाला.
नगरला दमदार पाऊस
नगर शहर व परिसरात सलग  शनिवारी दमदार पावसाने हजेरी लावली. तालुक्याच्या पश्चिम भागातील मुळा, भंडारदरा धरणांचे पाणलोट क्षेत्रात मोसमी पावसाचे आगमन झाले असून कळसूबाई, हरिश्चंद्रगडाच्या पर्वतरांगात मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे आहेत.