कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे कोल्हापुरातील पंचगंगा नदी यंदा पाचव्यांदा पात्राबाहेर गेली आहे. राधानगरी धरणातील सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. राधानगरी, काळम्मावाडी, वारणा या मोठ्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात पाण्याखालील बंधाऱ्यांची संख्या एका दिवसात २८ने वाढली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याला काल सायंकाळपासून पावसाने झोडपायला सुरुवात केली आहे. आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. पश्चिम घाटात, राधानगरी धरण परिसरात आज दिवसभर मुसळधार वृष्टी झाली. दुपारनंतर तीन तास जोरदार पाऊस पडण्याचा इशारा (रेड अलर्ट) हवामान विभागाने दिला होता.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे नदी, नाले तुडुंब भरुन वाहत आहेत. कोल्हापूररात पंचगंगा नदी पाचव्यांदा पात्राबाहेर गेल्याचे पाहायला मिळत आहे. पंचगंगेची पाणीपातळी ३० फुटांवर गेली असून इशारा पातळी ३९ फूट आहे. राजारामसह ४८ बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. काल सायंकाळी याच वेळी (चार वाजता) सतरा बंधारे पाण्याखाली होते.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच भागामध्ये आज मुसळधार पाऊस पडत आहे. विशेषता पाणलोट क्षेत्रातील राधानगरी , भुदरगड , शाहूवाडी, आजरा या तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. याच बरोबर करवीर , गडहिंगळज ,कागल चंदगड या तालुक्यात ही संततदार पाऊस सुरू होता. कमी पाऊस असलेल्या हातकणंगले शिरोळमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली.
राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून दहा हजार क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून १५०० क्युसेक असा एकूण ११ हजार ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक वाढलेली आहे. धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे.
दूधगंगा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करणेकरिता आज धरण सांडव्यावरून नदीपात्रामध्ये एकूण ५५००घनफूट प्रतिसेकंद विसर्ग नदीपात्रमध्ये असणार आहे. नदीपात्रामधील पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. पावसाचे प्रमाण, पाण्याची आवक यांस अनुसरून आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविणेत येणार आहे. वारणा या धरणातूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
आंबा घाटात दरड कोसळली

दरम्यान, कोल्हापूर – कोकण मार्गाची वाहतूक होणाऱ्या आंबा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे रत्नागिरी ते कोल्हापूर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. येथे आपत्ती निवारण व बांधकाम विभागाकडून दरड कोसळलेला भाग दूर करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते.