पंढरपूर : हवामान खात्याचा अंदाज अचूक ठरवत सोलापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. विशेष करून सीना नदीकाठच्या गावात शुक्रवारी रात्रीपासून दिवसभर पावसाची कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस पडला. तसेच लगतच्या जिल्ह्यातून सीना नदीत येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने पुन्हा पुराचे संकट ओढावले आहे. दरम्यान, प्रशासन सतर्क असून बचाव कार्यासाठी बाहेरगावाहून आलेली टीम जिल्ह्यात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात १३० टक्के इतकी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. या पावसासह लगतच्या जिल्ह्यातील पावसाचे पाणी नदीच्या माध्यमातून सोडण्यात आले आणि त्याचा परिणाम नदीकाठच्या गावांत पाणी शिरल्याने पूर स्थितीला सामोरे जावे लागले होते. हवामान खात्याने दोन दिवस पावसाचा अलर्ट दिला आहे. हवामान खात्याचा निर्णय अचूक ठरवत जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुंगशी या गावात सीना नदी आणि पावसाचे पाणी आले. त्यामुळे या गावात पाणी शिरण्यास सुरुवात झाली होती. येथील पुलावर पाणी आल्याने वाहतूक थांबविण्यात आली. नदीच्या पाण्यात दिवसभरात वाढ होत आहे. त्यामुळे सीना नदीच्या पात्रातील पाणी आता बाहेर येऊन शेत, वस्तीपर्यंत पोहोचले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याही वेळेस यंत्रणा सतर्क ठेवली आहे. कोल्हापूर, सांगली व लातूर येथील बचाव कार्यासाठी आलेली टीम जिल्ह्यातच होती. त्या सर्वांना पुन्हा एकदा कार्यान्वित केले आहे. तसेच ७२ निवारा केंद्र उभारण्यात आली होती. या सर्व केंद्रांत पुन्हा एकदा प्रशासनाने सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे बाधित गावात पोलीस, महसूल विभागाचे कर्मचारी तैनात ठेवण्यात आले होते. यात काही बदल करून पुन्हा कार्यान्वित केले आहे. चार दिवसांपूर्वी काही गावांतील नागरिक प्रशानाने सागून देखील बाहेर पडले नाही. नंतर पुराचे पाणी वाढल्यावर त्यांना सुरक्षित आणले. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे. दरम्यान, काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसाचा अलर्ट आहे. त्यामुळे प्रशासन सुद्धा अलर्ट आहे मात्र नागरिक धास्तावले आहेत.

भीमाकाठी सतर्कतेचा इशारा

भीमा खोरे आणि पुणे जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यातील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उजनीसह पुण्यातील धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढला. पर्यायाने उजनीतून भीमा नदीत पाणी सोडण्यात आले. सायंकाळी ६ वाजता ८० हजार क्युसेक करण्यात आला. त्यामुळे पंढरपुरातील भीमा अर्थात चंद्रभागा नदीत पाणी मोठ्या प्रमाणत आले आहे. वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली गेली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.