रत्नागिरी :  मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यात अक्षरश: धुमाकूळ घातला असून रत्नागिरीत काजळी नदीला आलेल्या पुरामुळे टेंबपुल, सोमेश्वरात पाणी शिरले, तर शास्त्री नदीचे पाणी फुणगुस बाजारपेठेत घुसले. गोळप येथील काही भाग पुन्हा खचला असून दापोलीत दरड कोसळली.

रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोविस तासांत सरासरी १०१.४३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यातील अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळपासून वेगवान वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर पाऊस कोसळत होता. सततच्या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. स्वामी स्वरुपानंद समाधी मार्गावर पुराच्या पाण्याने वेढला गेला होता. आजुबाजूच्या सखल भागात पाणी शिरले होते. किनारी भागातील काही इमारतींच्या आवारात पाणीच पाणी होते. संगमेश्वर फुणगूस येथील शास्त्री खाडीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने खाडीपट्टय़ात पुरजन्य परिस्थिती होती.

येथील बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीतही पाणी शिरल्यामुळे शेतकरी शेतीची कामे अर्धवट सोडून घरी परतले.

रत्नागिरीतील काजळी नदीला आलेल्या पुरामुळे किनाऱ्यावरील भागात पाणी शिरले होते. टेंबेपुल येथील एक मंदिर पुराच्या पाण्याने वेढले गेले होते. सोमेश्वर, पोमेंडी येथील किनारी भागातील भातशेती पाण्यात गेली होती. सर्वाधिक पावसाची नोंद रत्नागिरी शहरासह शिरगाव परिसरात झाली. त्यामुळे चवंडे वठार, फगरवठार, मांडवी, मारुती मंदिर, थिबा पॅलेस, शेरे नाका परिसरातील घरात पाणी शिरले होते. गल्लीगल्लीमधून वाहणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. पावसामुळे दुपारपर्यंत अनेकांनी घरीच थांबणे पसंत होते. गोळप— मानेवाडीत पुन्हा जमीनीचा काही भाग खचला आहे. तेथील तिन्ही कुटूंबांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

राजापूर तालुक्यातील महाळुंगे मधलीवाडी येथे सुमारे पाचशे मीटरच्या परिसरात जमीन खचली असून रस्त्यालाही भेगा गेल्या आहेत. तेथे भूस्खलन होण्याची शक्यता आहे. मधलीवाडी परिसरातील अन्य चार कुटुंबांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आली आहे.

दापोली तालुक्यात अतिवृष्टिमुळे खाडिपट्टयात पुर आला होता. दापोली -आपटी मार्गावर पाणी आल्याने दापोली मेडिकल कॉलेज जवळील पुलावरून वाहतुक बंद होती. काशिनाथ जोशी बेंडलवाडी दाभोळ यांच्या घराजवळ दरड कोसळली आहे. वावघर बलेकर वाडम्ी येथे शंकर मंदिर जवळ विहिरीची संरक्षण भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात आले आहेत. करजगाव—मधलीवाडी कडे जाणारा कॉजवे पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे मधलीवाडी जानेषश्वरवाडी या दोन वाडय़ांचा गावाजवळील संपर्क तुटला.

खेडमधील जगबुडी, मंडणगडमधील भारजा यासह चिपळूणमधील वाशिष्ठी, शास्त्री, बावनदी, राजापूरातील अर्जुना, कोदवली नद्याही दुथडी भरुन वाहत होत्या. सायंकाळी पावसाचा जोर ओसरल्यामुळे पुराचे पाणी कमी झाले . पण आणखी  किमान दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

तालुका          पाऊस (मिमी)

मंडणगड            १००.३७

दापोली              १०९.८०

खेड                    ८७.४०

गुहागर               ८५.५०

चिपळूण            ५४.३५

संगमेश्वर          ९५.९०

रत्नागिरी          १८९.३०

लांजा                 १०५.७०

राजापूर              ९३.३०