नांदेड : महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जीवितहानीही झाली, ही बाब दुःखद असून सरकारने बाधित शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करावी, अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी केली आहे.गेल्या दीड महिन्यात नांदेडसह बहुतांश मराठवाड्यात अतिवृष्टी व पुराने कहर केल्यामुळे लाखो हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके नष्ट झाली.

मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, जनावरांचे मृत्यू तसेच खासगी आणि सार्वजनिक मालमत्तांचे प्रचंड नुकसान झाल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठवाडा व राज्याच्या अन्य भागातील आपत्तीची माहिती खा. गांधी यांना दिली. तत्पूर्वी नांदेडच्या संदीपकुमार देशमुख यांनी या काँग्रेस नेत्यास सविस्तर पत्र पाठविले होते.

मराठवाडा आणि राज्यातील एकंदर वर्तमान समजल्यानंतर गांधी यांनी आपली भावना फेसबूक पेजच्या माध्यमातून व्यक्त केली. अशा प्रसंगात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी प्रशासनास सहकार्य करावे तसेच गरजूंना आवश्यक ती मदत करावी, असे आवाहन त्यांनी गुरुवारी केले. खा. गांधी यांनी ओल्या दुष्काळाखालील मराठवाड्याचा दौरा करावाच ही विनंती आम्ही त्यांना पुन्हा करणार आहोत, असे देशमुख यांनी सांगितले.

नांदेड जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसांत कोठेही अतिवृष्टी झाली नसली, तरीही गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाच्या वरच्या भागातील धरणे व प्रकल्पातून पाण्याचा येवा सुरूच असल्यामुळे नांदेड शहर आणि जिल्ह्यातील नदीकाठ भाग बाधित झाला आहे. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात कोठेही जीवितहानी झालेली नाही. जिल्हा प्रशासनाची मदत आणि बचाव कार्यातील यंत्रणा ठिकठिकाणी कार्यरत आहे.

नांदेड शहरात वेगवेगळ्या भागातील निवारा केंद्रांमध्ये स्थलांतरीत झालेल्या व्यक्तिंची संख्या साडे चारशेच्यावर (454) गेली असून त्यांच्याकरिता मनपाने आवश्यक ती व्यवस्था केली असल्याचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी सांगितले.

नेत्यांचे पाहणी दौरे

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी गुरुवारी सकाळपासून हदगाव, अर्धापूर, नांदेड आणि लोहा तालुक्यात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. भाजपा नेते अशोक चव्हाण आपल्या परिपाठानुसार भोकर मतदारसंघातील गावांमध्ये फिरत होते तर काँग्रेस पक्षाने नेमलेल्या समितीनेही अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देऊन बाधितांची विचारपूस केली.