अलिबाग : दक्षिण रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा बसला. अतिवृष्टीमुळे माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजिवन विस्कळीत झाले आहे. दिवसभरात दोन घटनांमध्ये एकूण चार जण बुडाले आहेत.
प्रादेशिक हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी शनिवारी रेड अलर्ट जारी केला होता. जिल्ह्यात वादळी वाऱे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. रायगड जिल्ह्यातील दक्षिण भागातील तालुक्यांत मुसळधार पावासाने हजेरी लावली. त्यामुळे वृक्ष उन्मळून पडणे, वीज पुरवठा खंडीत होणे सखल भागात पाणी शिरणे यासारख्या घटना घडल्या. अतिवृष्टीमुळे नद्या नाले यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली होती.
जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८२ मिमी पावसाची नोंद झाली होती. माणगाव येथे १७० मिमी, म्हसळा येथे १४५ मिमी, श्रीवर्धन येथे १४३ मिमी, पोलादपूर १२८ मिमी, सुधागड १२६ मिमी, उरण ९७ मिमी, महाड ८५ मिमी मुरुड ८१ मिमी, खालापूर ७१ मिमी, रोहा ५१ मिमी, पनवेल ४० मिमी, अलिबाग ३२ मिमी. तळा ३९ मिमी, कर्जत १६ मिमी पावसाची नोंद झाली. माथेरान येथे ३३ मिमी पाऊस पडला.
जिल्हयात उद्याही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नदी किनाऱ्यावरील तसेच डोंगर उतारावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. रविवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. खालापूर तालक्यातील नाढाळ येथे एक पर्यटक बुडाला प्राथमिक माहिती आहे. तर माथेरान येथील शार्लेट तलावात परिसरात नवी मुंबईतून आलेले तीन पर्यटक बुडाले आहेत.
शेतीच्या कामांना वेग…
मे महिन्यात लवकर दाखल झालेल्या पावसामुळे कोकणात पेरण्या रखडल्या होत्या. नंतर पावसाने ओढ दिल्याने कृषी विभागाने पेरण्या उशीरा करण्याचा सल्ला दिला होता. मात्र गेल्या तीन दिवसांपासून कोकणात मॉन्सूनचा जोर पुन्हा वाढला आहे. शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. पेरणीसह शेतीच्या मशागतीच्या कामांना शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे.