Havey Rain मुंबई : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजपासून मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाची तीव्रता पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे.
गेले काही दिवस मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पावसाने हाहाकार उडाला आहे. संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. अशातच आजपासून संपूर्ण राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. या पावसाचा जोर पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याने हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही भागात या कालावधीत कमी वेळात अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असाही अंदाज आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना हा पाऊस दिलासा देणारा असेल तर, इतर भागातही पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक राहणार असल्याने यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे. आधीच पिकांचे नुकसान झालेले असताना पुन्हा पडणाऱ्या पावसामुळे या नुकसानात भर पडणार आहे. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर भागात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
त्यानंतर शनिवार, रविवारी मुंबई, ठाणे भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत अनेक भागात कमी वेळात जास्त पावसाची शक्यतादेखील आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन गरज असल्यास घराबाहेर पडा, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पावसाची तीव्रता असण्याची कारणे काय?
वरच्या हवेतील चक्रीय स्थितीच्या प्रभावामुळे गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज ते पश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता.
पुढे दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरावर डिप्रेशनमध्ये केंद्रित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ते दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यांवरून ओलांडण्याची शक्यता आहे.
ही चक्रीय स्थिती अंतर्गत कर्नाटक ओलांडून, तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक ओलांडून दक्षिण महाराष्ट्र किनाऱ्यापर्यंतची ट्रफ रेषा कायम आहे.
आज पावसाचा अंदाज कुठे
मेघगर्जनेसह पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट परिसर, नाशिक घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर,अहिल्या नगर, जालना, बीड, परभणी
मुसळधार पाऊस
कोल्हापूर, सोलापूर, लातूर,चंद्रपूर, गडचिरोली ,गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ
राज्यात आत्तापर्यंत ११३ टक्के पाऊस
राज्यात १ जून ते २५ सप्टेंबर या कालावधीत सरासरी ९७०.९ मिमी पाऊस पडणे अपेक्षित असतो. यंदा या कालावधीत सरासरी १०९८.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच १३ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, राज्यात जून ते सप्टेंबर या कालावधीत १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
मोसमी वाऱ्यांची माघार
नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी आणखी काही भागातून माघार घेतली आहे. मोसमी वाऱ्यांची सीमा गुरुवारी बुशहर, रामपूर, हरिद्वार, मुरादाबाद, इटावा, बांसवाडा, वलाभ, विद्यापीठ नगर, वेरावळ या भागात आहे. मोसमी वारे पुढील दोन दिवसांत राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागांतून परतण्याची शक्यता आहे.