परभणी : जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे तब्बल ३६ गावांचा संपर्क तुटला असून, अतिवृष्टीच्या काळात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. अतिवृष्टी, पूरस्थिती यामुळे जवळपास ६०० घरांची पडझड झाली असल्याची माहिती आज सायंकाळी जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली. पूरग्रस्त भागात मदत व बचाव कार्यासाठी तीन पथके कार्यरत असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे पाथरी तालुक्यात अनेक गावांमध्ये पाणी शिरले असून, ग्रामस्थांची अन्यत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पाथरी तालुक्यातील रामपुरी येथील साठ जणांची व्यवस्था प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निवासस्थानी करण्यात आली आहे, तर निवळी येथील दहा जणांची व्यवस्था प्राथमिक शाळेत करण्यात आली आहे. पाथरी, मानवत, गंगाखेड, सेलू या तालुक्यांतील काही गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यात खरिपाच्या पेरणीखालील क्षेत्र ५ लाख १५ हजार हेक्टर असून, बहुतांश क्षेत्र अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे बाधित झाल्याची माहिती आहे. अजूनही धरणातील पाण्याचा विसर्ग सुरूच असून, मदत व बचाव कार्यासाठी तीन पथके दाखल झालेली आहेत. या तिन्ही पथकांचे काम पाथरी, मानवत, सोनपेठ या तालुक्यांमध्ये सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथून सेनादलाच्या तुकडीस पाचारण करण्यात आले आहे.

जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अधिक नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात १३८ गावे अतिवृष्टीमुळे बाधित झाली होती. ६० हजार ७२९ हेक्टरवरील पिकांना या अतिवृष्टीचा फटका बसला होता. ५१ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी नुकसान भरपाईच्या निधीपोटी करण्यात आली होती. तर ऑगस्ट महिन्यात २५२ गावांना फटका बसला असून, ९० हजार ४८३ हेक्टरवरील पिके बाधित झालेली होती. या नुकसानीपोटी ७६ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आलेली होती. १८ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार परभणी जिल्ह्याला १२८ कोटी रुपयांची अतिवृष्टी मदतनिधीची रक्कम प्राप्त झाली असून, वाटपाची कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीने २८८ गावे बाधित झाली असून, ६६ हजार हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. अद्याप काही मंडळात झालेली अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे जे नुकसान झाले त्याचे पंचनामे सुरू आहेत. त्यानंतर नुकसानीचा आकडा वाढू शकतो. जिल्ह्यात अतिवृष्टीच्या काळात सहा व्यक्तींचा मृत्यू झाला असून, ३९ मोठी व दुधाळ जनावरे दगावली आहेत. ३० शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. अतिवृष्टीमध्ये आतापर्यंत ५७३ घरांची पडझड झालेली आहे. सध्या निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे अनेकांना तात्पुरते विस्थापित व्हावे लागले आहे. अशा स्थलांतरितांची संख्या ६०० एवढी आहे.