धाराशिव : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश गावांतील शेतकर्‍यांचे जलस्रोत आटल्याने रब्बीची पेरणी झाली नव्हती. सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पावसाने जिल्हाभरात दमदार हजेरी लावल्याने शेतशिवार खळाळून निघाला आहे. दुसरीकडे या पावसामुळे फळबागा, तूर तसेच भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस धाराशिव आणि कळंब तालुक्यात झाला आहे. उमरगा व लोहारा तालुक्यात कुठेही पाऊस नाही. मात्र जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग दाटून आले आहेत.

राज्यभरात ३० नोव्हेंबरपर्यंत सर्वदूर अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केला आहे. सोमवारी पहाटे शेजारील बीड, लातूर, परभणी जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्यानंतर मंगळवारी पहाटे अवकाळी पावसाने जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी पाच तालुक्यांमध्ये दमदार हजेरी लावली. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला अवकाळी पाऊस पुढील तीन तास कमी-अधिक प्रमाणात सुरू होता. या पावसामुळे शेतशिवारातील नदी-ओढे खळखळून वाहिले. ऊस पिकासह पेरणी झालेले ज्वारी, गव्हाचे क्षेत्र पाण्यात होते. रब्बीच्या पेरणीसाठी तयार करून ठेवलेल्या रानातही मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साठले होते.

हेही वाचा – “नुसतं बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, पण…”, मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा शिंदे सरकारवर संताप

धाराशिव तालुक्यातील बेंबळी व परिसरात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे शेतकर्‍यांनी शेतात काढून टाकलेला कांदा अचानक झालेल्या पावसात भिजून मोठे नुकसान झाले आहे. तसेच द्राक्षबागा, टोमॅटो, भाजीपाला व इतर बागा व फळभाज्यांसाठी हा पाऊस घातक ठरला. तसेच फुलोर्‍यात आणि शेंगा वाळण्याच्या स्थितीत असलेल्या तूर पिकालाही या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. मंगळवारी झालेल्या पावसानंतर कृषी विभागाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तरित्या नुकसानीची माहिती गोळा करण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यातील धाराशिव, ढोकी, जागजी, तेर, जवळा, कळंब, तेरखेडा, वाशी, ईटकूर, मोहा व येरमाळा या महसूल मंडळांमध्ये मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे काहीअंशी का होईना शेतशिवाराला आगामी काळात दिलासा मिळण्याची अपेक्षा शेतकरी वर्गाला आहे.

हेही वाचा – एमपीएससी उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी… मुलाखतीच्या टप्प्यावर वैद्यकीय चाचणीच्या निर्णयात बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धाराशिव मंडळात सर्वाधिक पाऊस

मंगळवारी पहाटे धाराशिव तालुक्यात सरासरी १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर धाराशिव मंडळात ३९.३ मिलीमीटर, ढोकी ३३, जागजी ३७, तेर २८, परंडा मंडळात १६.३, जवळा २२.३, भूम मंडळात ११, मानकेश्वर २८, कळंब ३१, ईटकूर १५, येरमाळा २४, मोहा १३, गोविंदपूर १८, वाशी ५, तेरखेडा २५, वाशी तालुक्यात ११ मिलीमीटर पाऊस नोंदला आहे. तुळजापूर, उमरगा आणि लोहारा तालुक्यात पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील धाराशिव, वाशी, कळंब, भूम आणि परंडा या पाच तालुक्यांत सरासरी ९ मिलीमीटर पाऊस झाला आहे.