वसईतून माहिती संकलनास सुरुवात; शहरातील प्रमुख धर्मगुरूंची समिती स्थापन

महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्म आणि त्याचा इतिहास यांची नोंद आता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोशामधून घेतली जाणार आहे. यासाठी वसईचे आर्चबिशपांच्या नेतृत्वाखाली प्रमुख धर्मगुरूंची समिती स्थापन करण्यात आली आहे

ख्रिस्ती धर्मीय महाराष्ट्रामध्ये गेल्या २० शतकांपासून आहे. विशेषत: वसईला ख्रिस्ती धर्मीय मोठय़ा प्रमाणावर आहेत. मात्र राज्यातील ख्रिस्ती धर्माची ओळख सर्वाना व्हावी यासाठी मराठी विश्वकोशामधून त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात वसईतून करण्यात आली असून त्यासंबंधी पहिली कार्यशाळा नुकतीच वसईत झाली.

फादर फ्रन्सिस दिब्रिटो, फादर फ्रान्सिस कोरिया, फादर रेमंड या समितीत आहेत, तर वसईचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो ख्रिस्ती धर्मीय माहिती संकलनाची सर्व सूत्रे सांभाळणार आहेत.

समिती काय करणार?

* बिशपांच्या नेतृत्वाखाली समितीने याबाबत माहिती संकलनास सुरुवात केली आहे.

* यासाठी २५० विषय व त्यांचे उपविषय यांची यादी तयार करण्यात आली आहे.

* ख्रिस्ती प्रार्थनास्थळांचे प्रकार, रचना, ख्रिस्ती उल्लेखनीय संस्था, चर्चमधील परस्पर विरोधी विचारधार, चर्चचा इतिहास, सात संस्कार, ख्रिस्ती धर्मियांचे विविध भाविक समूह, चर्चमधील सेवा श्रेणी, उपासनावर्ष यांसारख्या अनेक विषयांचा समावेश आहे.

* विश्वकोषातील माहिती परिपूर्ण आणि अधिकृत असावी यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहे. यासाठी राज्यात फिरून माहिती संकलित केली जाणार आहे.

* विश्वकोषात कॅथॉलिक, प्रोटेस्टंट आणि औरथोडॉक्स या तीन पंथाची माहिती मिळणार आहे.