पुणे, मुंबई : करोना संकटातून राज्य सावरत असतानाच वार्षिक मूल्यदरात (रेडीरेकनर) (मुंबई वगळता) सरासरी पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) ८.८० टक्के, तर बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सरासरी २.३४ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. राज्यात सलग दुसऱ्या वर्षी पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात वाढ करत यंदा तब्बल ८.१५ टक्के एवढी सर्वाधिक वाढ झाली आहे. ही दरवाढ आज, शुक्रवारपासून (१ एप्रिल) लागू होईल.

राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत राज्यातील वार्षिक मूल्यदर तक्ते जाहीर केले. करोनामुळे १ एप्रिल २०२० ऐवजी सप्टेंबर २०२० मध्ये रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२१-२२ या आर्थिक वर्षांत रेडीरेकनरचे दर ‘जैसे थे’ ठेवण्यात आले होते.

राज्यात रेडीरेकनर दरात सरासरी पाच टक्के, ग्रामीण भागात सरासरी ६.९६ टक्के, प्रभाव क्षेत्रात (शहरी भागालगतचा नव्याने विकसित होणारा भाग) ३.९० टक्के, नगरपालिका / नगरपंचायत क्षेत्रात ३.६२ टक्के आणि महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई वगळता) ८.८० टक्के वाढ झाली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात २.३४ टक्के वाढ झाली आहे. राज्यातील घरांच्या किमती आता गगनचुंबी..

महापालिका क्षेत्रांचा विचार करता सर्वाधिक दरवाढ मालेगावात १३.१२ टक्के, त्या खालोखाल औरंगाबाद १२.३८ टक्के, पिंपरी-चिंचवड १२.३६ टक्के, नाशिक १२.१५ टक्के, लातूर ११.९३ टक्के, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट गावांत १०.१५ टक्के, नांदेड-वाघाळा ८.९९ टक्के, धुळे ८.९८ टक्के करण्यात आली आहे.

कारण काय?

करोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने राज्याच्या महसुलात वाढ होण्यासाठी यंदा रेडीरेकनर दरात घसघशीत वाढ करत राज्य सरकारने नागरिकांना धक्का दिला आहे.

पुण्यात सर्वाधिक..

राज्यातील शहरासह जिल्ह्याचा विचार करता सर्वाधिक ८.१५ टक्के दरवाढ पुणे जिल्ह्यात करण्यात आली आहे. पुणे महापालिकेची मूळ हद्द आणि समाविष्ट २३ गावांतील क्षेत्र वेगवेगळे दर्शविण्यात आले आहे. त्यानुसार मूळ हद्द म्हणजेच (नव्याने समाविष्ट झालेली २३ गावे वगळून) ६.१२ टक्के, महापालिकेत नव्याने समाविष्ट २३ गावांतील क्षेत्रात १०.१५ टक्के, तर उर्वरित ग्रामीण भागात ११.३ टक्के वाढ झाली आहे.