केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या वक्तव्यांसाठी नेहमीच चर्चेत असतात. पुन्हा असंच काहीसं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी जालन्यात बोलताना केले आहे. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेलं पाहू इच्छितो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. ३ मे रोजी जालन्यात परशुराम जयंतीनिमित्त एका कार्यक्रमात बोलत असताना दानवे यांनी हे वक्तव्ये केले आहे.

आगामी नगर परिषदेच्या निवडणुकीत जालना शहरात ब्राम्हण समाजाच्या लोकांना एका पेक्षा जास्त नगरसेवकपदे द्या अशी मागणी ब्राह्मण समाजातील सुनील किंगावकर यांनी त्यांच्या भाषणादरम्यान केली होती. त्यावर बोलताना रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“महानगरपालिकेच्या निवडणुका आल्याने आमच्याकडे लक्ष ठेवा. वेगवेगळ्या ठिकाणी ब्राह्मणांना प्रतिनिधित्व द्या. एकापेक्षा जास्त ब्राह्मण जालना महापालिकेमध्ये निवडणून द्या असा आपल्या बोलण्याचा अर्थ होता. पण ही विनंती मला लागू होत नाही. कारण मी ब्राह्मणाला केवळ नगरसेवक किंवा नगराध्यक्ष झालेला पाहू इच्छित नाही. मी ब्राह्मणाला या राज्याचा मुख्यमंत्री झालेला पाहू इच्छितो,” असे रावसाहेब दानवे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावर तिथे उपस्थित असलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवेंना टोला लगावला आहे. “खरं तर सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परशुरामच आहेत. यापूर्वीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी हे सुद्धा परशुरामच होते. त्यामुळे करु वगैरे या भानगडी सोडून द्या. माझ्याइतका देवेंद्र फडणवीसांच्या जवळचा कोणी मित्र असू शकेल असं मला वाटत नाही. ते मुख्यमंत्री होतील तर आम्हाला आनंदच आहे. त्यामुळे ज्याच्याकडे विद्वत्ता आहे तो पुढे जाऊ शकेल आणि या समाजामध्ये प्रचंड विदवत्ता आहे,” असे अर्जुन खोतकर म्हणाले.