राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी खळबळजनक विधान केलं आहे. एका जाहीर कार्यक्रमात उपस्थित लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात गुट्टे यांनी हे विधान केलं आहे. तुम्ही मला निवडून दिलं नसतं, तर मला आत्महत्या करावी लागली असती, असं गुट्टे यांनी सांगितलं. विशेष म्हणजे रत्नाकर गुट्टे यांनी तुरुंगातून निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी विजय संपादन केला होता. या घटनेला तीन वर्षे उलटल्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी आपबीती सांगितली आहे.

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा शहरात नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला रत्नाकर गुट्टे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी हे विधान केलं आहे. शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप रत्नाकर गुट्टे यांच्यावर होता. या प्रकरणात ते जवळपास साडेअकरा महिने तुरुंगात होते. दरम्यानच्या काळात त्यांनी तुरुंगात राहून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली. यामध्ये त्यांचा विजयही झाला.

हेही वाचा- “शेंबडं पोरगंसुद्धा…”, सावरकर आणि गोळवलकरांबाबतच्या ट्वीटनंतर जितेंद्र आव्हाड ट्रोल

रत्नाकर गुट्टे नेमकं काय म्हणाले?

कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लोकांना उद्देशून केलेल्या भाषणात गुट्टे म्हणाले, “माझ्यासमोर बसलेली जनता माझ्यासाठी मतदार नाही. तुम्ही माझा परिवार आहात, हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला कुटुंबासारखी वागणूक देईन. घरात जसं भाऊ, बहीण, आई-वडील असतात, त्याप्रमाणे तुम्ही माझा परिवार आहात. त्यामुळे माझं जीणं-मरणं-जगणं जे काही असेल, ते माझ्यासमोर बसलेल्या माझ्या परिवारासाठी असेल. कारण तुम्ही मला जीवदान दिलं आहे.”

हेही वाचा- “जे बाळासाहेबांच्या नावाचा उल्लेख धड करू शकत नाहीत, ते … ” नड्डांच्या भाषणातील ‘त्या’ शब्दावरून अंबादास दानवेंची भाजपावर टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी निवडणुकीत हारलो असतो, तर मला आत्महत्या करावी लागली असती. मी कधीही खोटं बोलत नाही. आयुष्यात कधीही खोटं बोललो नाही. गळ्यावर कुणी सुरी जरी ठेवली तरी मी खोटं बोलणार नाही. माझा हातून काही काम होणार असेल तरच मी ‘हो’ म्हणतो. काम होणार नसेल होत तर ‘नाही’ असं स्पष्ट सांगतो.कारण मी शब्द फिरवणारा माणूस नाही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय, मला आत्महत्या करावी लागली असती. पण तुम्ही निवडून देऊन मला जीवन दिलं आहे. हे जीवन मी बोनस म्हणून जगतोय,” असं रत्नाकर गुट्टे आपल्या भाषणात म्हणाले.