“कांदा परवडत नसेल तर खाऊ नका, दोन चार महिने कांदे खाल्ला नाही तर काय बिघडणार आहे? असा खोचक सवाल राज्याचे माजी कृषी मंत्री दादा भुसे यांनी काल (२१ ऑगस्ट) केला. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यात घमासान सुरू झाले आहे. ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय राऊत यांनीही दादा भुसे यांच्यावर टीका केली आहे. तसंच, यांचा मस्तवालपणा खोक्यातून आला आहे, असंही ते म्हणाले आहेत.

“यांच्या घरी कांद्याची पोती आहेत आणि सामान्य माणसाला कांदा आणि भाकरी खायची आहे. कांदा हे गरिबांचं खाणं आहे, हे श्रीमंतांचं खाणं नाहीय. शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा हे आमचं म्हणणं आहे. सामान्य घरातील गृहीणी कांद्यापासून वंचित राहू नये हे आमचं म्हणणं आहे. पण सरकार म्हणत असेल की एखादी गोष्टी मिळत नसेल तर खाऊ नका, तर मग सरकार कशाकरता आहे? हे दीडशहाणे मंत्री कालपर्यंत कृषीमंत्री होते या महाराष्ट्राचे. त्यांना या राज्याची स्थिती माहितेय का?” असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला. संजय राऊत आज माध्यमांशी बोलत होते.

हेही वाचा >> कांद्याचे दर वाढले; दादा भुसे म्हणतात, “परवडत नसेल तर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कांद्यामुळे भाजापचं दिल्लीचं सरकार गेलं होतं. महाराष्ट्रातही तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. आम्ही जनतेशी कसंही वागू शकतो, जनतेला काही बोलू शकतो, जनतेला काही सल्ले देऊ शकतो हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण झाला आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून खाऊ नका, अरे तुम्ही उपलब्ध करून द्या. हा काय सल्ला झाला काय?”, असंही संजय राऊत म्हणाले.