Heavy Rain Alert for Mumbai, Raigad, Thane & Palghar : गेल्या २४ तासांपासून राज्यात ठिकठिकाणी संततधार तर काही भागांमध्ये चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबई, बारामती व कर्जत शहरातील काही रस्त्यांवर नदीसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तर, ठाणे व पुण्यातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. नागरिकांना रस्त्यावरून वाहनं चालवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस सुरू राहील असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, कोकण व पश्चिम महाराष्ट्रात पुढील ४ तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच काही जिल्ह्यांना अलर्ट जाहीर केला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबई, नवी मुंबई शहर व रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट, ठाणे व पालघरला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. या भागातील नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.

मुंबई लोकलचा खोळंबा

महाराष्ट्रात पुढील तीन ते चार तासांत मुसळधार पाऊस होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. प्रामुख्याने उत्तर कोकणात ढगांच्या गडगडाटासह व वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या पावसामुळे मुंबई लोकलचा खोळंबा झाला आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे, रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यामुळे लोकल सेवा उशिराने चालू आहे. मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या १५ मिनिटे तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक १० मिनिटे उशिरा आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसबाहेर पाणी साचलं आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील बस सेवा खोळंबली आहे.

कर्जतमध्ये जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचंही मोठं नुकसान

कर्जत शहरात सलग दोन दिवस मुसळधार पाऊस चालू आहे. पावसामुळे कर्जत शहरातील मुख्य बाजारपेठ, बसस्थानक, महाविद्यालय चौक, मुख्य रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक या भागांमध्ये पाण्याची पातळी वाढली आहे. अनेक भागांमधील जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, डाळिंब व इतर फळबागा तसेच कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोसमी पाऊस महाराष्ट्रात दाखल

मोसमी पावसाने नेहमीच्या वेळेपेक्षा तब्बल दोन आठवडे आधीच, रविवारी (२४ मे) महाराष्ट्राची सीमा ओलांडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तसेच कर्नाटक, गोव्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. पाठोपाठ आज पश्चिम महाराष्ट्र व कोकणात मुसळधार पाऊस चालू झाला आहे.