परभणी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका पिकांना बसला असून आज शनिवारी (दि.१३) नोंदवल्या गेलेल्या पर्जन्यमानानुसार जिल्ह्यातल्या काही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पूर्णा तालुक्यातील कौडगाव शिवारात थूना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात चार जण अडकले होते मात्र पूर्णा व परभणी रेस्क्यू टीमने त्यांना सुखरूप बाहेर काढले.
जिल्ह्यात काल शुक्रवारपासून काही भागात जोरदार पाऊस झाला. विशेषतः पूर्णा, पालम या दोन तालुक्यांमध्ये नदी नाल्यांना पाणी आले. या दोन्ही तालुक्यातील अंतर्गत वाहतूक बराच काळ खोळंबली होती. ज्या भागात अतिवृष्टी झाली होती त्याच भागात पुन्हा पावसाने दणका दिल्याने शिवारातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
जिल्ह्यात परभणीसह पूर्णा पालम या दोन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. सोयाबीन व कापूस ही दोन्ही पिके काही भागात पाण्याखाली आल्याने आता ती हातची गेली आहेत. अनेक ठिकाणी शेतामध्ये गुडघ्या एवढे पाणी साचल्याने या पाण्याचा निचरा होणार कसा असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. ज्या भागात पाणी साचले त्या भागातील पिके आता पिवळी पडत चालली आहेत.कालच्या पावसाने परभणी शहरातही दाणादाण उडवली. शहराच्या अनेक भागात पाणी साचले. विशेषतः वसमत रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र होते.
परभणी तालुक्यातील सिंगणापूर मंडळात ६५.५ मिली, पिंगळी मंडळात ९५ मिली, परभणी ग्रामीण मंडळात ९५ मिली एवढा पाऊस झाला तर पूर्णा तालुक्यातील पूर्णा मंडळात १३९ मिली, ताडकळस मंडळात ९६.३ मिली, कात्नेश्वर १४७.५ मिली पाऊस झाल्याची नोंद आहे. पालम तालुक्यातील अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये पालम ७९.८ मिली, बनवस ७५.८ मिली, पेठशिवणी ८९.३ मिली अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याच्या मुंबई केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुढील सोमवार (दि.१५) पर्यंत पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चौघांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढले.
पूर्णा शिवारात समृद्धी महामार्गाचे काम चालू असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या कामाचे साहित्य, सामग्री, यंत्रे आहेत. ही सर्व सामग्री थूना नदीच्या पुराच्या पाण्यामध्ये अडकल्यामुळे या मशिनरीवर काम करणारे चार मजूर अडकलेले होते. त्या अडकलेल्या मजुरांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.विक्की सिंग लक्ष्मण सिंग, सलाउद्दीन सिद्दिकी, शिवकुमार, सदाकत अली अशी या मजुरांची नावे आहेत.ही बचाव मोहीम पोलीस प्रशासन, नगर परिषद पूर्णा, अग्निशमन दल व महसूल प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पाडण्यात आली अशी माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली.