सांगली : ईश्वरपूर शहराचे नामकरण उरूण ईश्वरपूर करण्याचा अध्यादेश पुढील आठवड्यात शासन काढेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिले. इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करण्याची घोषणा राज्य सरकारने अधिवेशनात केली. मात्र, या नावात उरूण या नावाचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त होत असून उरूणचा समावेश करण्याच्या मागणीसाठी इस्लामपुरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. या उपोषणस्थळी उपमुख्यमंत्री पवार यांनी भेट दिली.

यावेळी श्री. पवार म्हणाले, ईश्वरपूर शहराचे नामकरण उरुण- ईश्वरपूर व्हावे ही मागणी रास्त असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या निर्णयाबाबत सकारात्मक विचार केला आहे, पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस, मी स्वत:, मंत्री पाटील व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्रालयात एकत्रित बसणार असून यावेळी उरुण ईडरपूर असा नामकरणाचा आदेश काढला जाईल, उरुण या शहराची ओळख आहे ती कायम राहील याची काळजी करू नका.

लोकांची इस्लामपूरचे नामांतर करण्याची आग्रही मागणी विचारात घेउन राज्य शासनाने शहराचे नाव ईश्‍वरपूर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आमदार सदाभाउ खोत यांनी विधान परिषदेत मागणी केली. यावर विधान परिषदेत संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर विधान सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी नामांतराची घोषणा केली. मात्र, गावचे नाव उरूण देवीमुळे असल्याने याचा नावाचा समावेश नामांतरात करण्यात यावा अशी आग्रही मागणी नागरिकांची आहे.

नामांतराचे स्वागत करत असताना उरूण नावाचा उल्लेख करण्यात यावा या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषण स्थळी कार्यकर्त्यांची भेट घेउन उपमुख्यमंत्री पवार यांनी उरूणचा नावात समावेश पुढील आठवड्यात करण्यात येईल अशी घोषणा केली.

राज्यात औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरचे अहिल्यानगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले आहे. यानंतर इस्लामपूरचे नाव ईश्‍वरपूर करण्याची घोषणा राज्य शासनाने केली असून याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात येत असल्याचे शासनाने जाहीर केले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी उपोषण स्थळी कार्यकर्त्यांची भेट घेतली यावेळी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले- पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, संजय कोरे, केदार पाटील, शंकरराव उर्फ बाळासाहेब पाटील, संजय पाटील, शंकर पाटील, भास्कर मोरे, महेश मोरे, बाबुराव मोरे, डॉ. अतुल मोरे, माणिक मोरे, रजनिकांत मोरे, प्रताप मोरे आदींसह नागरिक उपस्थित होते.