सांगली : आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळिंब सौदे बाजारात बुधवारी दर्जेदार डाळिंबाला प्रतिकिलो तब्बल ५५१ रुपयांचा सर्वोच्च दर मिळाला. पंढरीनाथ नागणे यांच्या ‘मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्स’मध्ये नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला हा भाव मिळाला. श्रावण महिन्यास प्रारंभ झाल्याने डाळिंबाचे दर वाढले आहेत. किमान ८० ते कमाल २०० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. सध्या बाजार समितीच्या सौदे बाजारात दररोज सरासरी ३ ते ४ हजार क्रेटची आवक होते. त्यांपैकी निम्मी आवक मंगलमूर्ती फ्रूट सप्लायर्समध्ये होते.

माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील शिवलिंग माने यांच्या डाळिंबाला दर्जानुसार प्रतिकिलो ५४, ८६, ११३, १४० व ५५१ पर्यंत प्रतिकिलो असा दर मिळाला. पिलीव येथील जहांगीर शमसुद्दीन मुलाणी यांच्या मालाला ६८, ९९, १४६, २०० व २६४, माळशिरस येथील चांगदेव वाघमोडे यांच्या मालाला ५७, ८६, १०४, १३६ व १७१ आणि श्रीगोंदा अहिल्यानगर येथील बंडू दत्तू लकडे यांच्या डाळिंबाला ४०, ७४, ९६, १२२ व १४१ रुपये असा दर मिळाला. दर्जेदार लाल रंगाच्या डाळिंबाला चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.

हेही वाचा : Cabinet Meeting : विना परवानगी झाड तोडल्यास आता ५० हजारांचा दंड होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १३ मोठे निर्णय

आटपाडी बाजार समिती सौदे बाजारात डाळिंबाबरोबरच ड्रॅगन फ्रूट, पेरूचीही दैनंदिन आवक वाढलेली आहे. चांगल्या मालाबरोबरच डागी मालाचेही दर तेजीत आहेत. शेतकऱ्यांनी बागेत येणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी दरात माल देण्याऐवजी बाजार समितीच्या सौदे बाजारात आपला माल देऊन चांगला भाव मिळवावा, असे आवाहन मंगलमूर्ती उद्योगसमूहाचे अध्यक्ष पंढरीनाथ नागणे यांनी केले आहे. बाजार समिती सौदे बाजारात राज्यातील आणि देशातील फळविक्रेते आणि व्यापारी हजेरी लावतात. बाजारात पारदर्शक कारभारामुळे दर्जेदार आणि डागी डाळिंबालादेखील चांगला दर मिळत असल्याचे बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी सांगितले.