सांगली : एमडी अंमली पदार्थासाठी लागणारा ११ लाखांचा कच्च्या मालाचा साठा मांजर्डे (ता. तासगाव) येथील शेतातील पत्र्याच्या शेडमधून रविवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि तासगाव पोलीसांच्या पथकाने जप्त केला. इरळी (ता. कवठेमहांकाळ) येथील शेतात मुंबई पोलीसांनी छापा टाकून मेफड्रोन अंमली पदार्थ निर्मितीचा कारखाना दि. २३ मार्च रोजी उघडकीस आणला होता. यावेळी सहा जणांना पोलीसांनी अटक केलेली होती. यापैकी प्रसाद मोहिते याच्या मांजर्डे येथील रानात पत्र्याच्या शेडमध्ये संशयास्पद मालाचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे रविवारी छापा टाकण्यात आला.

हेही वाचा : “रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या ठिकाणी एमडीमध्ये वापरण्यात येत असलेल्या द्रवरूप क्लोरोफार्म १५ बॅरेल आणि संशयित द्रव पदार्थाचे ४० लिटरचे १२ कॅन या ठिकाणी मिळाले. याची किंमत ११ लाख ३६ हजार ३७० रूपये आहे. याचा वापर इरळी येथे एमडी तयार करण्यासाठी करण्यात येत होता. संशयित आरोपी सध्या मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात आहेत. सहा आरोपीपैकी प्रविण उर्फ नागेश शिंदे रा. बलगवडे आणि प्रसाद मोहिते यांच्यात नातेसंबंध असून यातूनच हा साठा मांजर्डे येथील शेतात करण्यात आला होता अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.