सांगली : आरक्षणावरून जाती-जातींमध्ये वाद निर्माण करून राज्यातील शांतता व सुव्यवस्था अडचणीत आणण्याचा काहींचा प्रयत्न असून सरकारने यावर बारकाईने लक्ष ठेवावे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना शुक्रवारी सांगलीत म्हटले आहे. सांगली येथे जाहीर सभेवेळी मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले, आता आमचे ओबीसीमधून आरक्षण अंतिम टप्प्यात आले असताना काही मंडळी जाणीवपूर्वक जाती-जातींमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. गेली ७० वर्षे या मंडळींनी आमचे आरक्षण खाल्ले आहे. आता आमच्या हक्काचे आरक्षण मिळत असताना यांना राजकारण सुचत आहे. आम्हाला चिडवण्याचा आणि त्यातून काही तरी बरे वाईट वक्तव्य झाले की दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न यामागे असावा. आता अशा लोकांना प्रत्युत्तर द्यायचे नाही, असे आम्ही ठरवले असून केवळ आरक्षणाचे ध्येय समोर ठेवून आमचा लढा शांततेच्या मार्गाने सुरूच राहील.

हेही वाचा : कायद्याचे उल्लंघन करून जरांगेंची पहाटे चार वाजता सभा, गुन्हा नोंद नाहीच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

छगन भुजबळ यांनी दगडाला शेंदूर फासून देव केल्याची टीका केली, याकडे लक्ष वेधले असता जरांगे म्हणाले, तुम्ही जेलमध्ये जाऊन आला, मग तुम्हाला का देव मानतील? तुम्ही आमच्या शेपटीवर पाय ठेवाल तर पुढे काय होईल याचा विचार करा. मी सासर्‍याच्या घरी राहण्यास असल्याची टीका करणार्‍यांनी बीडमधील अनेक बांधव पाण्यासाठी गोदातीरी आले आहेत, हे लक्षात घ्यावे. बिनकामाचे कळप एकत्र येऊन मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यात ते यशस्वी होणार नाहीत. कारण आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण मागत आहोत. कितीही टीका झाली तरी त्याकडे लक्ष द्यायचे नाही, त्याला महत्वही द्यायचे नाही, असे आपण ठरवले असल्याचे मनोज जरांगे यांनी यावेळी सांगितले.