सोलापूर : उच्चांकी साखर उत्पादनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाळ्याने निराशा केल्यामुळे ओढावलेल्या दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादन घटण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांकडून ऊस पळवापळवीसह ऊसदर देण्यात चढाओढ सुरू झाली आहे. सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने सर्वप्रथम उसाचा जास्त दर देण्याचे जाहीर करताच इतर कारखानेही जादा दर देण्यासाठी पुढे सरसावत आहेत. यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यात ४१ पैकी ३८ साखर कारखान्यांनी धुराडे पेटवून गळीत हंगाम सुरू केला आहे. यंदा जिल्ह्यात दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रात ऊस लागवड झाल्याची नोंद आहे. परंतु दुष्काळजन्य परिस्थितीत पाण्याअभावी सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्राएवढे उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

उसाचे वजन घटणार असल्यामुळे साहजिक साखर उताराही घटण्याची चिन्हे आहेत. गतवर्षी गळीत हंगामात जिल्ह्यात दोन लाख ३० हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली असता ३३ साखर कारखान्यांनी १२० दिवस गळीत हंगाम करून दोन कोटी २९ लाख ५३ हजार ९४ मे. टन ऊस गाळप केला होता. त्यातून दोन कोटी १६ लाख १७ हजार ९० क्विंटल साखरेची निर्मिती केली होती. परंतु यंदा दुष्काळाचे सावट असल्यामुळे ऊस टंचाई भेडसावणार आहे. यातच मुक्या जनावरांना जगविण्यासाठी चाऱ्याकरिता उसाचा वापर होण्याचीही चिन्हे दिसत आहेत.

हेही वाचा : रिक्त पदांमुळे रेल्वे प्रवाशांना फटका? सुरक्षा विभागातील १९ हजार पदे रिक्त

या पार्श्वभूमीवर गतवर्षीपेक्षा जास्त म्हणजे ३८ साखर कारखान्यांनी गळीत हंगाम सुरू केला आहे. सुरूवातील बहुसंख्य कारखान्यांनी प्रतिटन उसाला २३०० रूपये ते २५०० रूपयांचा हप्ता जाहीर केला होता. दुसरीकडे शेतकरी संघटनाही ऊसदर वाढीच्या प्रश्नावर जास्त आक्रमक झाल्या नसतानाच सोलापूरच्या सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रचंड अडचणीत असूनही उसाला अंतिम दर २९०० रूपये जाहीर करून पहिला हप्ता २४०० रूपये देण्याचे ठरविले. त्यामुळे इतर बहुसंख्य साखर कारखान्यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम वाढवून २७०० रूपयांपर्यंत जाहीर केली.

हेही वाचा : सांगली : स्वाभिमानीकडून कारखानदारांना खर्डा-भाकरी

माढा तालुक्यातील पिंपळनेरचा सर्वात मोठ्या विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल शुगर, मोहोळ तालुक्यातील भीमा, जकराया, पंढरपूरचा विठ्ठल, दक्षिण सोलापूरचा जयहिंद, लोकमंगल, उत्तर सोलापूरचा सिध्दनाथ व इतर अनेक साखर कारखाने वाढीव हप्ता देण्यासाठी पुढे सरसावले आहेत. आर्थिक संकटात असलेल्या पंढरपूरच्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यानेही निमूटपणे २७०० रूपयांचा हप्ता जाहीर केला आहे. शेजारच्या कर्नाटकात उसाला मिळणाऱ्या वाढीव दराचा विचार करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आकृष्ट करण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये जणू चढाओढ सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : पुण्यात शरद पवार अन् अजित पवार यांच्यात भेट, नेमकं कारण काय? सुप्रिया सुळे म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एरव्ही, आपल्या फडातील ऊस गाळपासाठी नेण्याकरिता ऊस उत्पादक शेतकरी साखर कारखानदारांकडे खेटे घालतो. परंतु यंदा ऊस टंचाई विचारात घेता साखर कारखानदारांवर शेतकऱ्यांच्या उसाच्या फडात जाण्याची पाळी आली आहे. त्यातून काही कारखान्यांनी प्रोत्साहनपर बक्षीस योजनाही जाहीर केल्या आहेत. मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदरच्या भीमा सहकारी साखर कारखान्याने उसाला एफआरपीपेक्षा १२५ रूपये जादा दर देण्याचे जाहीर केले आहे.