नागपूरहून दीड हजार बोकडं शारजाहला निर्यातीसाठी सज्ज असलेले विमान जैन समाजाच्या विरोधामुळे शनिवारी नागपूर विमानतळावर रोखण्यात आले. राजस्थानातून ही बोकडं नागपूरला आणण्यात आली होती. प्राण्यांविरोधातील हिंसा रोखण्याच्या उद्देशाने जैन समाजाने ही निर्यात रोखण्याची विनंती केल्यानंतर राज्य सरकारकडून विमानाचे उड्डाण रोखण्याचे आदेश देण्यात आले.

भाजपाचे राज्यसभा खासदार विकास महात्मे यांनी ही बोकडं आणि मेंढ्या निर्यातीची कल्पना राज्य सरकारला सुचवली होती. मात्र, याला जैन समुदयाकडून विरोध करण्यात आला. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम थांबवल्याचे महात्मे यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, विदर्भातील पशुपालक असलेल्या धनगर समाज आणि शेतकऱ्यांसाठी चांगली आर्थिक प्राप्ती करुन देणारे हे धोरण असून यापूर्वीही अनेक दशकांपासून राज्यातून बोकडांची परदेशात निर्यात केली जात आहे. त्यामुळे हे पहिल्यांदाच घडते आहे अशा अर्थाने यावर आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही.

महात्मे हे धनगर समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाज आरक्षणासाठी भाजपा सरकारकडे विविध मार्गांनी मागणी करीत आहे. त्यामुळेच महात्मे आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी या बोकडं आणि मेंढ्याच्या निर्यातीद्वारे धनगर समाजाचा राग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे.

या कारवाईच्या विरोधाचे समर्थन करताना अखिल जैन समाजचा भाग असलेल्या दिगंबर जैन महासमितीच्या महाराष्ट्र युनिटच्या अध्यक्षा रिचा जैन म्हणाल्या, जैन समाज हा सर्व प्रकारच्या हिंसेविरोधात आहे. बोकडांची निर्यात करण्यामुळे नागपूर शहराचे नाव बदनाम होईल. जे संत्र्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे. यामुळे प्राण्यांचा या शहराला तळतळाट लागेल. नेपाळमध्ये अशा प्रकारे प्राण्यांच्या कत्तलींमुळे काही काळापूर्वी मोठी नैसर्गिक आपत्ती आली होती.

मात्र, देशात दररोज हजारो प्राण्यांच्या मांसासाठी कत्तली होतात. यावर जैन म्हणाल्या, कायद्यानुसार, मांसाची निर्यात करण्याला परवानगी आहे. मात्र, जिवंत प्राण्यांची निर्यात करता येत नाही. असे असले तरी सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या कत्तलींना आमचा विरोध आहे. त्यामुळे यासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात सोमवारी बोकडांच्या निर्यातीवर बंदीबाबत जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचीही जैन समाजाच्या नेत्यांनी भेट घेतली आहे. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांचीही भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तर, या निर्यातीची जबाबदारी असलेले युएस एन्टरप्रायजेसचे उल्हास मोहिले म्हणाले, आम्ही या निर्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली होती. दुबईतील चार्टर्ड विमानाची सोयही यासाठी करण्यात आली आहे. यासाठी आम्ही याआधीच खूप पैसा खर्च केला आहे. महाराष्ट्र सरकारचीही याला मंजूरी आहे. त्यामुळे ही निर्यात थांबवण्यात येऊ नये.