जालना : जालना शहर आणि जिल्ह्यात शनिवारी दिवसभरानंतर मध्यरात्रीनंतरही जोरदार वृष्टी झाली. रविवारी सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यातील निम्म्या म्हणजे २६ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन जालना शहरातील सव्वादोनशे नागरिकांना महानगरपालिकेने सुरक्षितस्थळी हलविले.
भोकरदन तालुक्यामधील सर्वंच आठ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. भोकरदन शहरात तर १६५ मि.मी. पावसाची नोंद झाली. अतिवृष्टी झालेल्या २६ महसूल मंडळांपैकी सात घनसावंगी तालुक्यातील आहेत. पावसामुळे जालना शहराजवळील कुंभेफळ गावाचा बाहेरील तुटला होता. अंबड तालुक्यातील दुनगाव येथील घरांत नदीचे पाणी साचले होते. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतेक भागांत जनजीवन विस्कळीत झालेले आहे.
जायकवाडी जलाशयातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतून जाणारी गोदावरी नदी भरून वाहत असल्याने काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. जालना आणि बुलडाणा जिल्ह्याच्या सीमेवर परंतु बुलडाणा जिल्ह्यात असलेला खडकपूर्ण प्रकल्प भरला असून, त्यातून विसर्ग सुरू आहे.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यात येत असल्याने तेथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्याच्या सीमेवरील निम्न दुधना प्रकल्पातूनही विसर्ग सुरू असून, या धरणाचे ‘बॅक वॉटर’ येणाऱ्या परतूर तालुक्यातील गावांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आल आहे.
सिंचन प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. तर जिल्ह्यातील सातपैकी सहा मध्यम सिंचन ओसंडून वाहत आहेत. साठपैकी चाळीस लघु सिंचन प्रकल्प भरून वाहत आहेत. मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राने रविवारी जालना जिल्ह्यास ‘यलो अलर्ट’ दिला होता. त्याचप्रमाणे २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यानही पावसाची शक्यता वर्तविली आहे. गेल्या आठ-दहा दिवसांपासूनच्या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले असून, जालना शहरासह अन्य ठिकाणच्या बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. आठवडी बाजारांवरही सततच्या पावसाचा परिणाम झाला आहे.