कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला असून, साखर कारखान्याच्या अवसायक पदी कोरेगाव तालुक्याच्या दुय्यम सहकारी उपनिबंधक प्रिती काळे यांची शासनाने नियुक्ती केली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने इतर अनेक बँकांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत कर्जाच्या वसुलीसाठी लिलावात काढला. गुरु कमोडिटी प्रा. लि. या खासगी कंपनीने लिलावात तो साखर कारखाना ६५ कोटी ७५ लाख रुपयांना २०१० साली विकत घेतला. साखर कारखान्याच्या तत्कालीन चेअरमन माजी महसूलमंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी लगेचच २०११ सालापासून विविध कोर्टात जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना विक्री विरोधात अनेक दावे दाखल करुन, राज्य सरकारच्या आणि राज्य सहकारी बँकेच्या विरोधात आवाज उठवला. जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना विक्री व्यवहार रद्द व्हावा आणि साखर कारखाना पुन्हा शेतकरी सभासदांच्या मालकीचा करावा, यासाठी गेली १० वर्षे शालिनीताई पाटील यांचा न्यायालयीन संघर्ष सुरू होता. असे असताना जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अचानक अवसायक नेमून शासनाने शालिनीताई पाटील यांना मोठा धक्का दिला.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांनी जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या अवसायानाची प्रक्रिया सुरु करतेवेळी नोटीस बजावली होती, त्यास कारखान्याने कायदेशीर व समर्पक उत्तर दिले होते. त्यावर या विषयी दाद मागण्यासाठी न्यायालयात जाण्याबाबत लेखी स्वरुपात कळविले होते. त्यानुसार कारखान्याने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. या प्रादेशिक सहसंचालकांच्या आदेशावर स्थगितीसाठी अर्ज केला असून, त्यावर युक्तिवादाची प्रक्रिया सुरु आहे, ४ फेब्रुवारीला सुनावणी झाली असून, आता ४ मार्चला युक्तिवाद केला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्याचे साखर सहसंचालक यांनी जरंडेश्र्वर सहकारी साखर कारखाना शासकीय आदेशानुसार अवसायनात काढला असून, साखर कारखान्याच्या अवसायकपदी कोरेगावच्या उपनिबंधक प्रिती काळे यांची नियुक्ती शासनाने केली आहे. यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.