अलीकडच्या काळात राजकीय नेत्यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर तुलना केल्याचं समोर आलं आहे. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडाची तुलना शिवाजी महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी केली होती. पण, आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवाजी महाराजांबरोबर तुलना केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

प्रकरण काय?

शिवसेनेकडून ( शिंदे गट ) एक बँनर लावण्यात आलं आहे. या बँनरवर ‘३५० वर्षानंतर… पुन्हा तोच योग’ या आशयाच्या देखाव्यात एका बाजूला भवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देताना दाखवण्यात आलं आहे. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे हे एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सुपूर्द करताना देखाव्यात दाखवलं आहे.

हेही वाचा : नितेश राणेंनी राहुल गांधींची दाऊदबरोबर केली तुलना; म्हणाले, “पाकिस्तान अन्…”

यानंतर जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत ‘अरे काय चालू आहे महाराष्ट्रात,’ असा सवाल विचारला आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “तुलना तर सोडाच… थेट छत्रपती शिवाजी महाराजच… अरे काय चालू आहे, महाराष्ट्रात. विद्रुपीकरण एका ऐतिहासिक घटनेचं. ते पण इतकं,” अशी संतप्त भावना आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठा धक्का! एकनाथ खडसेंचा काँग्रेस, ठाकरे गटावर आरोप; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा”

मनसे आमदार राजू पाटील यांनीही यावरून टीका केली आहे. “कोणी स्वतःलाच ‘जाणता राजा’ म्हणवतं, तर कोणी ही अशी चित्रं काढून घेतं. अशा उपमांनी किंवा तुलनांनी कुणालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखाचीही सर येणार नाही. राजकीय स्वार्थासाठी शिवाजी महाराजांची तुलना करताना जनाची नाही, तर मनाची तरी चाड ठेवा. शिवप्रभू एकमेव होते, आहेत आणि राहतील. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवरा,” असा सल्ला राजू पाटील यांनी दिला आहे.