कराड : कळंत्रेवाडी (ता. कराड) भरवस्तीत बिबट्या घुसल्याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाल्याने एकच खळबळ उडाली असून, परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
कळंत्रेवाडी परिसरात गतवर्षी बिबट्याचा ठिकठिकाणी वावर असल्याचे दिसून आले होते. संभाजी थोरात यांच्या व उत्तरेश्वर वाघमारे यांच्या सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर दिसून आला होता. त्यानंतर बराच काळ बिबट्या आठळून न आल्याने याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला होता. परंतु, आज शनिवारी (दि. १४) कळंत्रेवाडीचे उपसरपंच दिलीप यादव यांच्या बंगल्यासमोरील अंगणातील दरवाजातून बिबट्या आत घुसल्याचे त्यांच्या सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाले आहे. यामुळे कळंत्रेवाडी परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्याने कळंत्रेवाडीचे ग्रामस्थ धास्तावले आहेत.
दरम्यान, याबाबत उपसरपंच दिलीप यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास बिबट्याने दरवाजाच्या बाजूला असलेल्या छोट्याशा जागेतून आत प्रवेश करत एक वर्षाच्या पाळीव कुत्र्यावर झडप घालून धूम ठोकली. दरम्यान, बाहेर काहीतरी आवाज आल्याचे लक्षात आल्यानंतर यादव यांनी बाहेर येऊन पाहिले असता, बिबट्याने एक वर्षाच्या पाळीव कुत्र्याला घेऊन धूम ठोकल्याचे दिसून आले. सदरची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यावर ग्रामस्थांनी घाबरून न जाता सतर्क राहून आपल्या कुटुंबासह पशुधनांचीही काळजी घेण्याचे आवाहन उपसरपंच दिलीप यादव यांनी केले.