कराड : कराड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे. जवळपास २५ वर्षांनी हा योग जुळून आल्याने डझनभर नावे चर्चेत आली असून, दिग्गज रिंगणात राहणार हे निश्चित असल्याने कमालीची चुरस राहणार आहे. त्यात भाजपमधून उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच राहील आणि आमदार डॉ. अतुल भोसले कोणाच्या नावावर राजी होणार याची आत्तापासूनच चर्चा रंगली आहे.

कराडचे नगराध्यक्षपद ४३ वर्षे भूषवण्याचा विक्रम नोंदवणारे (कै.) पी. डी. पाटील यांचे पुत्र माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील तसेच माजी नगराध्यक्ष जयवंत पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव, भाजपचे प्रदेश सरचिटणीस विक्रम पावसकर यांची नावे आघाडीवर आहेत. तर, नगरपालिकेतील प्रदीर्घ अनुभव असलेले विनायक पावसकर, माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय रणजीत पाटील तसेच माजी नगराध्यक्ष शारदा जाधव, अल्ताब शिकलगार, अरुण जाधव, ऋतुराज मोरे, अतुल शिंदे, सौरभ पाटील, इंद्रजीत गुजर यांची नावे चर्चेत आहेत.

गतखेपेच्या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी शिंदे या निर्णायक मताधिक्य घेवून जिंकल्या होत्या. तर, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील आघाडीचे सभागृहात बहुमत राहिले होते. सध्या काँग्रेस पक्षाला आणि चव्हाण गटाची पीछेहाट झाली असून, भाजपचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचा बोलबाला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्यास इच्छुकांची गर्दी राहणार आहे.

डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणाऱ्या बहूतेक स्थानिक नेते, आजी – माजी नगरसेवक व इच्छुकांना पालिकेतील नगराध्यक्षपद आणि नगरसेवकपदासाठी उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. ही संख्या खूपच मोठी असल्याने उमेदवारी देताना, आमदार डॉ. अतुल भोसले यांची कसोटी लागणार आहे. त्यातून नाराजी उफाळून आल्यास राजकीय समीकरण धक्कादायक राहणार असल्याने याकडे राजकीय वर्तुळासह कराडकर नागरिकांच्या नजरा लागून राहणार आहेत.