कर्जत : अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळावा, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख बळीराम यादव यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी तालुकाप्रमुख बळीराम यादव, शिवसेनेचे नेते अमृत लिंगडे, सुभाष जाधव, महावीरशेठ बोरा, चंद्रकांत घालमे, दीपक गांगर्डे, दीपक मांडगे, पप्पू फाळके, अविनाश मते, सुभाष सुद्रिक, पोपट धनवडे, शिवाजी नवले, अजित कानगुडे, अमोल सुपेकर, महेंद्र दोधाड, अक्षय तोरडमल, महेश तोरडमल, दादा शिंगाडे, नारायण तांदळे, राजेंद्र तांदळे, रोहित तोरडमल, अनिल दरेकर, गणेश शेळके, तात्या शिंदे, रुपेश शिंदे, संजय पुराने, बापूराव गुंड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व शिवसैनिक सहभागी झाले होते.

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यानंतर मोर्चा तहसील कार्यालयावर गेला. यानंतर तहसीलदार गुरू बिराजदार यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.या निवेदनात म्हटले आहे की, मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन, बाजरी, मका, कांदा, द्राक्षे, डाळिंब आदी पिके पाण्यात बुडाली असून, शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शासनाने अद्याप पंचनामे व मदतीबाबत ठोस निर्णय घेतला नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर तयार असलेल्या शेततळी, वीज पुरवठा व्यवस्था, पंपसेट व वाहतूक व्यवस्था यांचेही मोठे नुकसान झाल्याचेही यामध्ये निदर्शनास आणून दिले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने तातडीने विशेष निधी मंजूर करून पीकविमा हप्ता माफ करावा, तसेच नुकसानग्रस्तांना किमान हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने द्यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

या वेळी यादव म्हणाले की, शेतकऱ्यांचा प्रलंबित पीकविमा, शेतीमालाचे भाव आणि नुकसान भरपाई यासंदर्भात शासनाचे धोरण अत्यंत विलंबाने कार्यान्वित होते. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर मदत मिळत नाही. शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहून तातडीने निर्णय घ्यावा. या निवेदनासोबत कर्जत तालुक्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तपशीलही जोडण्यात आली आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना सतत पाठपुरावा करेल, असा निर्धार यादव यांनी व्यक्त केला.