राहाता : ऊस दराच्या बाबतीत आमची कुणाशी स्पर्धा नाही. आमची स्पर्धा आमच्याशीच आहे. आजवर शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी बांधील आहोत. परंतु केवळ साखर उद्योगावरच जास्तीचा दर देणे शक्य नाही, त्यासाठी उपपदार्थ निर्मिती करणे ही काळाची गरज असल्याने भविष्यात कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना उपपदार्थ निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

कोळपेवाडी (ता. कोपरगाव) येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२५-२६ या वर्षाच्या ७१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ कारखान्याचे ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्यावेळी आमदार आशुतोष काळे बोलत होते. याप्रसंगी पदाधिकारी पद्माकांत कुदळे, ज्ञानदेव मांजरे, एम.टी. रोहमारे, बाबासाहेब कोते, संभाजी काळे, अर्जुन काळे, गौतम बँकेचे अध्यक्ष संजय आगवण यांच्यासह कारखान्याचे संचालक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार काळे म्हणाले, सहकारी साखर कारखानदारीच्या बाबतीत सरकारची काय धोरणे आहेत व सरकार कशा पद्धतीने मदत करणार आहे याचा अभ्यास करून आपल्याला पुढे जायचे आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर देण्याची परंपरा कर्मवीर काळे यांच्यापासून चालत आली आहे. ही परंपरा मार्गदर्शक अशोक काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही अविरतपणे सुरू ठेवणार आहे.

ऊसाचा अंतिम हप्ता १५० रुपये टनाप्रमाणे दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला आहे. कारखान्याची सातत्याने योग्य ऊसदर देण्याची परंपरा असून आजपर्यंत कारखाना कार्यक्षेत्र व कार्यक्षेत्राबाहेरील असा कोणताही भेदभाव न करता सरसकट ३ हजार १०० रुपयेप्रमाणे ऊस दर दिला आहे.

ऊस उत्पादकांप्रमाणेच कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी २० टक्के बोनस देण्याचे काळे यांनी जाहीर केले. ‘एआय’च्या माध्यमातून हवामान केद्र, सोलर, ड्रीप सिस्टीम, सेन्सर आदी गोष्टीचा उपयोग करून कमी खर्चात, कमी क्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. संचालक सूर्यभान कोळपे यांनी आभार मानले.

‘स्थानिक’मध्ये विजयाची पुनरावृत्ती करा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण जाहीर झाले असून लवकरच निवडणुकांच्या तारखा जाहीर होतील. आजवर सर्वांनी केलेल्या सामूहिक प्रयत्नातून आपण विजयश्री प्राप्त केली आहे. यापुढेही त्याच विजयाची पुनरावृत्ती करायची आहे, त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले.