Karuna Dhananjay Munde Beed Assembly Results: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करून चर्चेत आलेल्या करूणा धनंजय मुंडे यांनी परळी आणि बीड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. परळीतून त्यांचा अर्ज बाद करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. परळीनंतर त्यांनी बीड विधानसभेतून निवडणूक लढवली मात्र त्यांना अतिशय मोजकी मते मिळाली आहेत. बीड विधानसभा मतदारसंघ हा क्षीरसागर कुटुंबियांमुळे ओळखला जातो. इथे जयदत्त क्षीरसागर यांच्यानंतर त्यांचा पुतण्या संदीप क्षीरसागर आमदार आहे. यावेळी क्षीरसागर कुटुंबातील दोन चुलत भाऊ आमने सामने आले होते. यात संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला.

करुणा धनंजय मुंडे यांना किती मते मिळाली?

बीड विधानसभा मतदारसंघात विजयी उमेदवार संदीप क्षीरसागर यांना १,०१,८७४ एवढी मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या स्थानावर त्यांचे चुलत भाऊ योगेश क्षीरसागर आहेत. त्यांना ९६,५५० एवढी मते मिळाली आहेत. संदीप क्षीरसागर यांनी अवघ्या ५३२४ च्या मताधिक्याने योगेश क्षीरसागर यांचा पराभव केला. तिसऱ्या स्थानावर अपक्ष उमेदवार अनिल जगताप असून त्यांना केवळ १५,६१३ मते मिळू शकली आहेत. या तीन उमेदवारांव्यतिरिक्त इतरांना फारशी मते मिळू शकलेली नाहीत.

हे वाचा >> Beed Vidhan Sabha Constituency: बीड विधानसभा मतदारसंघात कुटुंबातील लढाई संदीप क्षीरसागर यांनी जिंकली; सलग दुसऱ्यांदा आमदार

करुणा धनंजय मुंडे यांना अवघी ५११ मते मिळाली आहेत. करुणा मुंडे या मुळच्या बीडच्या नाहीत. मात्र त्या गेल्या काही काळापासून बीडच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. यावर्षी त्या लोकसभा निवडणुकीलाही उभ्या राहिल्या होत्या. बीड लोकसभा मतदारसंघात त्यांना केवळ १,५९९ एवढी मते मिळाली होती. बीड लोकसभेला विजयी उमेदवार बजरंग सोनवणे यांना ६,८३,९५० एवढी मते मिळाली होती.

Assembly Election Result Beed
बीड विधानसभा निवडणुकीचा निकाल

धनंजय मुंडे यांच्यावर केले होते गंभीर आरोप

करुणा मुंडे यांनी परळी विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र त्यांचा अर्ज छाननीवेळी बाद करण्यात आला. करुणा मुंडे यांच्या अर्जावर सूचक म्हणून नाव असलेल्या व्यक्तीने मी स्वाक्षरी केली नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले. त्यानंतर अर्ज बाद करण्यात आला. यावरून करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याबद्दल त्यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता.

View this post on Instagram

A post shared by Karuna Dhananjay Munde (@karuna.d.munde)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्ज बाद केल्यानंतर संतापलेल्या करुणा मुंडे म्हणाल्या, परळीच्या विकासासाठी आणि तेथील गुंडगिरी संपविण्यासाठी मी परळी आणि बीड विधानसभेतून उमेदवारी अर्ज भरला होता. पण महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे. माझा परळीतील अर्ज बाद ठरविला गेला. मी एकटी महिला असून मला कुणाचाही पाठिंबा नाही. पण माझ्या नवऱ्याने माझा अर्ज बाद केला. एका महिलेला घाबरून अर्ज बाद केला गेला. तुम्ही सूचक विकत घेतला, पण तुम्ही मला संपवू शकणार नाही.