राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राचा निर्णय; लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती करणार
वर्धा : बालकांना चांगले व वाईट स्पर्श ओळखता यावे, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने यावर्षी इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमात याबाबत ज्ञान देणाऱ्या विषयाचा समावेश केला आहे. या निर्णयाने लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती होऊन तसले प्रकार टाळता येतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षण संस्था (एनसीईआरटी)ने २०१८ पासून अशा विषयांचा समावेश पर्यावरणाच्या पुस्तकात केला आहे. हा अभ्यासक्रम सर्व केंद्रीय विद्यालये तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे संचालित सर्व शाळांत शिकवला जातो. एनसीईआरटीचे प्राथमिक शिक्षण शाखाप्रमुख ए.के. राजपूत यांनी याबाबत पाठपुरावा करणारे डॉ. इंद्रजित खांडेकर यांना या विधायक निर्णयाची माहिती कळवली आहे.
बाललैंगिक शोषणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबतच प्रत्येक शालेय विद्यार्थी लैंगिक अत्याचार ओळखण्याइतपत सक्षम होईल, यादृष्टीने शालेय अभ्यासक्रमात बदल करण्याचे डॉ. खांडेकर यांनी एका अहवालातून सुचवले होते. डिसेंबर २०१६ला पाठवलेल्या या अहवालावर केंद्रीय मंडळाने सकारात्मक पाऊल उचलले आहे. अहवालात मांडलेले मुद्दे पुस्तके सुधारणा समितीपुढे मांडण्याचे सूतोवाच २०१७ मध्येच करण्यात आले होते. विद्यमान प्राथमिक शिक्षण प्रणालीतील कुठल्याच पातळीवर लैंगिक शोषणाबाबत जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रबोधन होत नाही. शालेय पुस्तकात योग्य ती माहिती दिल्यास विद्यार्थी, पालक व शिक्षक दक्ष राहतील. अत्याचाराची माहिती उघड होईल. संभाव्य गैरप्रकार टळेल, असे सुचवण्यात आले होते.
डॉ. खांडेकर व त्यांचे सहकारी विद्यार्थी अनघा इंगळे, मोहम्मद कादीर, मनीषा, सावित्री, श्रीनिधी दातार, अनुश्री यांनी अहवाल तयार करीत तो मानव संसाधन विकास मंत्रालयास पाठवला होता. त्याची दखल केंद्रीय मंडळाने घेतली आहे. अभ्यासक्रमातील हा बदल बाललैंगिक शोषण समस्या कमी करण्यात मलाचा दगड ठरेल, असे मत डॉ. खांडेकर यांनी व्यक्त केले.
शिक्षकांनो, हे करा
चांगल्या-वाईट स्पर्शाबाबत वर्गात चर्चा करावी, काही विद्यार्थ्यांसोबत व्यक्तिगत संवाद साधावा, समुपदेशकाची मदत घ्यावी, बाललैंगिक समस्येवर प्रकाश टाकण्याऱ्या ‘कोमल’ हा चित्रपट विद्यर्थ्यांना दाखवावा, असा सल्ला राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान व प्रशिक्षण केंद्राने शिक्षकांना दिला आहे.