कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणारी गावे वगळून नवीन लेआउट करून शक्तिपीठ महामार्ग करण्याची विनंती केली जाणार आहे, असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे सांगितले. ते म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी आधी विरोध दर्शवला होता. पण आता योग्य मोबदला मिळाला तर जमिनी द्यायची तयारी काही शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. तसे निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे. त्यामुळे शासन आता या मार्गाने जाणार आहे.
अलमट्टीबाबत १५ दिवसांत बैठक
अलमट्टी धरणाची उंची वाढू देणार नाही, असे विधान मुख्यमंत्र्यांनी इचलकरंजीत केले आहे. केंद्र सरकारने अशी अधिसूचना काढू नये, यासाठी धनंजय महाडिक व धैर्यशील माने या दोन्ही खासदारांनी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेतली आहे. अलमट्टी उंचीच्या विरोधाबाबत पंधरा दिवसांनी पुन्हा बैठक होणार आहे, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका
महामार्गावरील सातारा-कागल काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने या मार्गावरील प्रवासास खूप वेळ लागत आहे. वाहतुकीची कोंडी होत आहे. कामाला विलंब केल्याबद्दल कंत्राटदाराला नोटीस देऊन काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका बैठकीवेळी केली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सातारा -कागल महामार्गावरील उड्डाणपूल, सांगली फाटा ते उचगाव मार्गाचा उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प आराखडा, पंचगगा पुलावरील बास्केट ब्रिज आदी कामांंबाबत बैठक झाली. यावेळी मुश्रीफ यांनी ही भूमिका घेतली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. बैठकीस खासदार शाहू छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.