सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवेळी आणि जोरदार पावसामुळे शेती आणि बागायती पिकांवर गंभीर परिणाम झाला आहे. नारळ, सुपारी (पोफळी), भात, तसेच इतर फळबागांनाही या पावसाचा फटका बसला आहे.
पिकांचे मोठे नुकसान
- भात शेती: हंगामातील पावसाचे वेळापत्रक बिघडल्यामुळे भात पिकाचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी भात शेती पाण्याखाली गेली आणि पिकांची वाढ खुंटली.
- नारळ आणि सुपारी: जास्त पाऊस आणि कमी सूर्यप्रकाशामुळे नारळ आणि सुपारीच्या झाडांवर बुरशी वाढली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. यामुळे उत्पादन घटले आहे आणि बागायतदार चिंतेत आहेत. काही वर्षांपूर्वीच्या तुलनेत नारळाच्या दरात मोठी वाढ झाली असून, आता एक नारळ ३० ते ६० रुपयांपर्यंत विकला जात आहे. कोकम, जांभूळ, आवळा, आणि आगामी आंबा-काजू पिकांनाही या बदलत्या हवामानाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तातडीने पाहणी करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवण्याची आणि त्वरित नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. याशिवाय, कोकणातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती लक्षात घेऊन आंबा, काजू, कोकम, नारळ, सुपारी यांसारख्या पिकांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
कृषी विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह?
शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. बदलत्या हवामानाचा अभ्यास करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे आवश्यक असताना, अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या परिस्थितीमुळे अनेक शेतकरी शेतीपासून दुरावत असल्याचे चित्र दिसत आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांचे जीवनमान पूर्वपदावर येईल.
प्रगतशील बागायतदार शिवप्रसाद देसाई म्हणाले, यंदा हंगाम पुर्व पाऊस झाला त्यामुळे पोफळी (सुपारी) व नारळ बागायती वर परिणाम जाणवू लागला आहे. हंगाम पुर्व आणि हंगामात कोसळलेल्या पावसामुळे शेती व बागायतीवर परिणाम झाला आहे. फळबागांची नुकसानी झाली आहे. अजूनही काजू आणि आंबा हंगाम यायचा आहे.
भाजपचे बांदा मंडल उपाध्यक्ष गुरु कल्याणकर म्हणाले, सिंधुदुर्गात नारळ-सुपारीच्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याचे आर्थिक गणितच बिघडले आहे. त्यामुळे केवळ पाहणी व आश्वासन देऊन दिशाभूल न करता शेतकऱ्यांना प्रत्यक्षात नुकसान भरपाई मिळणे महत्त्वाचे आहे.