अलिबाग- कोकणात यंदा सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र तरीही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणे तुडूंब भरली आहे. त्यामुळे जलचिंता मिटली असली तरी अनियमित पावसामुळे शेती समोरील आव्हाने कायम आहेत.
राज्यातील इतर भागांच्या तुलनेत कोकणात जास्त पाऊस पडतो. मात्र यंदा अर्धा पावसाळा संपला तरी कोकणात यंदा वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत ३९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जुन महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यात अनियमीत आणि कमी पाऊस पडतो आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यात जुलै महिन्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस नोंदवला गेला आहे. महारेन संकेतस्थळानुसार वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत रायगड मध्ये ३४.७ टक्के, रत्नागिरीत ३९.८ टक्के, तर सिंधुदुर्गात ४२.४ टक्के पाऊस पडला आहे. पावसाने ओढ दिल्याचे चित्र असले तरी तीनही जिल्ह्यातील धरणे, आणि पाटबंधारे प्रकल्प तुडुंब भरली आहेत.
रायगड जिल्ह्यात लघुपाटबंधारे विभागाच्या २८ प्रकल्पापैकी २२ धरणे शंभर टक्के भरली आहेत. उर्वरीत धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मोठे, तीन मध्यम आणि ३७ लघुपाटबंधारे प्रकल्प आहेत. ज्यापैकी १६ धरणे पुर्ण क्षमतेनी भरली आहेत. ७ धरणांमध्ये ८० टक्केहून अधिक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील एकूण धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा ७० टक्क्यांपर्यंत पोहाचला आहे. रत्नागिरीतील जिल्ह्यातील राजापूर येथील अर्जूना धरण पूर्ण क्षमतेनी भरले आहे. तर लघुपाटबंधारे विभागाकडील २८ धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. उर्वरीत धरणांमध्ये पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र अनियमीत पावसामुळे शेतीसमोरील आव्हाने कायम आहेत. रायगड जिल्ह्यात भात लावणीची कामे रखडली आहेत.
जिल्हा | १८ जुलै पर्यंत सामान्यपणे पडणारा पाऊस | सद्यस्थितीत पडलेला पाऊस | भरलेली धरणे |
रायगड | ७०० मिमी | ३८९ मिमी | २२ |
रत्नागिरी | ६६८ मिमी | ५२५ मिमी | १६ |
सिंधुदुर्ग | ६०६ मिमी | ५७३ मिमी | २८ |