कराड : वीज, सिंचन आणि पाणीपुरवठा या तीनही गरजांसाठी महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणारे कोयना धरण जूनमध्ये एकतृतीयांशहून अधिक भरले आहे. २१ जून रोजी धरणात तब्बल ३५.६५ टीएमसी (अब्ज घनफूट, धरण क्षमतेच्या ३३.८७ टक्के) जलसाठा तयार झाला आहे. हा जलसाठा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २०.३३ टीएमसी (धरण क्षमतेच्या १९.३१ टक्के) जादा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हाच पाणीसाठा १५.३२ टीएमसी होता. गेल्या काही वर्षांत जूनमध्ये तयार झालेला कोयनेतील हा सर्वाधिक जलसाठा आहे.

दरम्यान, धरण पाणलोटात यंदाच्या जूनअखेर पडलेल्या पावसामध्येही अडीचपट वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आजअखेर ८०७.३३ मिलिमीटर पाऊस पडला असून, गेल्या वर्षी तो ३५०.६६ मिलिमीटर होता. पश्चिम घाटात शनिवारी दिवसभरात पावसाचा जोर ओसरला असून, बहुतेक धरणक्षेत्रात तुरळक पावसाचे चित्र आहे. कोयना धरणक्षेत्रातही पावसाची मुसळधार ओसरली आहे.

यंदा मे आणि जून या दोन्हीही महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने राज्यातील अनेक जलसाठ्यांत मोठी वाढ झालेली दिसत आहे. या अंतर्गतच राज्याचे लक्ष लागलेल्या कोयनेतही ही वाढ मोठ्या प्रमाणात झालेली दिसत आहे. कोयना पाणलोटातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत असल्याने धरणात २१ जूनअखेरच धरणात तब्बल ३५.६५ टीएमसी जलसाठा तयार झाला आहे. यामध्ये शनिवारी (दि. २१) एका दिवशीच सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत २.१९ अब्ज घनफुटाने भरघोस वाढ झाली आहे. मागील वर्षी आज अखेर धरणात १५.३२ टीएमसी पाणीसाठा होता. त्यात तब्बल २०.३३ टीएमसी (धरण क्षमतेच्या १९.३१ टक्के) यंदा वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षींत जूनमध्ये तयार झालेला कोयनेतील हा सर्वाधिक जलसाठा आहे.

कोयना पाणलोटात एक जूनपासून सुरू झालेल्या जलवर्षात सरासरी ८०७.३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या नऊ तासांच्या कालावधीत कोयनानगरला २७ मिमी (एकूण ७९२), नवजाला २९ मिमी (एकूण ८४७), तर महाबळेश्वरला ३२ मिमी (एकूण ७८३ मिमी) पावसाची नोंद आहे.

आतापर्यंतच्या पावसामुळे बहुतेक जलसाठे तुलनेत उत्तम स्थितीत असून, सर्वदूर पाऊस सुरू असल्याने समाजमनात समाधानाची लहर आहे. पश्चिम घाटक्षेत्रात सर्वदूर मृगाच्या हलक्या ते भारी सरी कोसळत आहेत. कोयना पाणलोटात रात्रीच्या वेळी पावसाला आणखी जोर चढत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खेपेस मान्सूनपूर्व पाऊस धो-धो कोसळल्याने कोयना धरणासह अन्य धरणसाठे चांगल्या स्थितीत आहेत. अशातच चांगल्या प्रमाणात पाऊस कोसळणार असल्याच्या हवामान खात्याच्या अंदाजाने विशेषतः ग्रामीण जनतेत चैतन्यपूर्ण वातावरण आहे. मात्र, खरीप पेरण्यांबाबत अजूनही अनेक ठिकाणी अनिश्चिततेचे ढग असून, पाच-दहा टक्केही पेरण्या झालेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याला घाई-गडबड न करता यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करावा लागणार आहे.