कराड : कोयना धरणाची जलपातळी दरवाजाला टेकली असली तरी पाणलोटातील जोरदार पाऊसही ओसरला आणि धरणातील जलआवकही घटल्याने धरणाच्या सहा वक्री दरवाजातून कोयना नदीपात्रात करावयाचा जलविसर्ग तूर्तास तरी करण्यात येणार नसल्याचे पाटणचे तहसीलदार अनंत गुरव यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
सध्या कोयनेचा जलसाठा ७३.७० टीएमसी (अब्ज घनफूट) असून, धरणाच्या दरवाजाला पाणी टेकले आहे. यावर दरवाजातून पाणी सोडण्यासाठी धरण व्यवस्थापन सतर्क आहे. मात्र, पाणलोटात काही महसूल मंडलांचा अपवाद वगळता सर्वदूर मध्यम ते तुरळक पर्जन्यवृष्टी होत आहे. परिणामी, कोयना धरणाच्या दरवाजातून पाणी सोडण्याचा निर्णय तूर्तास लांबणीवर टाकण्यात आला आहे.
धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ४० हजार क्युसेकवरून (घनफूट) सात हजार क्युसेकसमीप येऊन ठेपली आहे. दुसरीकडे दोन-चार दिवसात पाऊस ओसरताना लख्ख सूर्यप्रकाश पडू लागल्याने खरीप पेरण्यांना पोषक वातावरण होत असून, शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळत आहे.
आज रविवारी चौथ्या दिवशीही कोयना पाणलोटातील पाऊस ओसरलेलाच आहे. दिवसभरात कोयना पाणलोटात १४.३३ मिमी. पाऊस तर, कोयनेचा जलसाठा ७३.७० टीएमसी (धरण क्षमतेच्या ७०.०२ टक्के) झाला आहे. कोयना पाणलोटात आजवर सरासरी २,१०९ मिमी. (वार्षिक सरासरीच्या ४२.१८ टक्के) पाऊस होताना, धरणातील पाण्याची आवक प्रतिसेकंद ७,२४४ क्युसेक राहिली आहे. पश्चिम घाटात बहुतांश महसूल मंडलात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसतो आहे.
आवक पाहून विसर्ग
दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार कोयना धरणाच्या दरवाजाला पाणी येऊन पोहोचले असले तरी पाण्याची आवक पाहून दरवाजातून पाणी सोडले जाईल. धरणातून ५० हजार क्युसेकपेक्षा जास्तीचा जलविसर्ग असू नये. आणि कृष्णा- कोयना नद्यांकाठी पूरस्थिती निर्माण होऊ नये असे नियोजन असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले आहे.
साताऱ्यात निम्मा पेरा
मान्सूनपूर्व तुफान पावसानंतर मोसमी पाऊसही जोरदार कोसळल्याने शेतशिवारात चिखल आणि दलदल झाल्याने त्याचा खरिपाच्या पेरण्यांना फटका बसला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खरिपाचा निम्माच पेरा झाला आहे. उसाचे क्षेत्र वगळता जिल्ह्यात दोन लाख ९७ हजार ९१३ हेक्टर खरिपाचे क्षेत्र असून, आजवर सुमारे दीड लाख क्षेत्रावर खरिपाचा पेरा झाला आहे. आता पावसाने सलग उघडीप घेऊन लख्ख सूर्यप्रकाशाचीही गरज आहे. अन्यथा, बरेच क्षेत्र नापेर राहण्याची भीती असून, सततच्या पावसाने पिकांची उगवण, वाढीवर परिणाम होणार असल्याने उत्पादन घटणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसतो आहे.