मोहनीराज लहाडे
नगर : करोना कालावधीत लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथिल झाले आहेत. मात्र याची दखल अद्याप रेल्वेने घेतलेली नाही. रेल्वेने अजूनही सर्वसाधारण वर्गाची अनारक्षित तिकिटे उपलब्ध करण्यास सुरुवात केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय तर होत आहेच, शिवाय रेल्वेतून विनातिकीट प्रवासी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झालेली आहे.
रेल्वेकडून प्राप्त झालेली आकडेवारीही तेच दर्शवते. सर्वसाधारण वर्गाच्या अनारक्षित तिकिटाची प्रवाशांना अद्यापि प्रतीक्षाच आहे. ऐन वेळचा प्रवास जणू रेल्वेला मान्य नसावा. नगरच्या रेल्वे स्थानकाची आकडेवारी प्रातिनिधिक मानली तरी रेल्वेच्या सर्वच स्थानकांसाठी ती लागू होते. करोना प्रतिबंधक उपाय म्हणून रेल्वेने सर्वसाधारण वर्गाचे अनारक्षित तिकीट देणे मार्च २०२० पासून बंद केले. तिकीट आरक्षित न करता गरजेच्या कामासाठी ऐन वेळचा प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. करोना प्रतिबंधक नियम शिथिल केल्यानंतर हळूहळू रेल्वेच्या प्रवासी संख्येत पुन्हा वाढ झाली. सात-आठ महिन्यांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटही उपलब्ध करणे सुरू केले. काही पॅसेंजर रेल्वे अद्याप सुरू झाल्या नसल्या तरी नगरमार्गे धावणाऱ्या २३ जलदगती गाडय़ाही पूर्ववत सुरू झाल्या आहेत. मात्र अनारक्षित तिकीट विक्री अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आहे.
मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेल्या नगरच्या रेल्वे स्थानकातून वर्षभरात सुमारे १० लाखांवर प्रवासी संख्या जाते. रोजची प्रवासी संख्या सुमारे तीन हजारांवर आहे. भारतीय लष्करातील पाच महत्त्वपूर्ण आस्थापना नगरमध्ये आहेत. त्यांचे मोठे मनुष्यबळ नगरमध्ये आहे. त्याच्यासाठीही रेल्वे प्रवासाची आवश्यकता भासते. करोनापूर्वी सन २०१९-२० मध्ये विनातिकीट प्रवास करणारे ४४ हजार ८५५ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ३ कोटी ३१ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. त्यापूर्वी सन २०१८-२९ मध्ये ४० हजार ८८६ प्रवासी आढळले. त्यांच्याकडून २ कोटी ९१ लाखांवर दंड वसूल करण्यात आला. सन २०१७-१८ मध्ये ही संख्या ३२ हजार ५१२ आढळली. मात्र करोनाकाळात निर्बंधांमुळे प्रवासी संख्या घटल्याने अवघे २५७७ प्रवासी विनातिकीट प्रवास करताना पकडले गेले.
परंतु करोना संसर्ग हळूहळू घटला. निर्बंध कमी झाले. रेल्वे सेवाही पूर्ववत झाली. गाडय़ांची संख्या वाढली. प्रवासी संख्याही पूर्ववत झाली. एप्रिल २०२१ ते मार्च २०२२ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. या कालावधीत तब्बल ६५ हजार ३७३ विनातिकीट प्रवासी आढळले. त्यांच्याकडून ४ कोटी ३७ लाख ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. करोनापूर्व परिस्थितीच्या तुलनेत ही वाढ मोठी आहे.
रेल्वे प्रवासी, रेल्वे प्रशासन, रेल्वे सल्लागार समिती या सर्वाच्या मते अनारक्षित तिकीट विक्री बंद असल्याने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ऐन वेळी प्रवास करावा लागणारे स्थानकावर येतात. तिकिटांची मागणी करतात, मात्र त्यांना ते उपलब्ध होत नाही. तिकीट तपासणी करणाऱ्यांना अशा प्रवाशांना परत पाठवणे हे एक प्रकारचे स्वतंत्र काम झाले आहे. वादाचे प्रसंगही उद्भवतात. मात्र प्रवास आवश्यक झालेले प्रवासी अखेर विनातिकीट प्रवासाला प्रवृत्त होत आहेत.
अनारक्षित तिकीट विक्री बंद असल्याच्या परिणामातून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असावी. मात्र संपूर्ण महाराष्ट्रातच अनारक्षित तिकीट विक्री बंद ठेवली गेली आहे. करोना प्रतिबंधक उपाययोजना म्हणून अनारक्षित तिकीट विक्री बंद ठेवली गेली आहे. रेल्वेचे आरक्षण चार महिन्यांपर्यंत आधीच होत असते, त्यासाठी वेळ द्यावा लागतो आहे. २९ जूनपासून अनारक्षित तिकीट विक्री पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.
– प्रदीप हिरडे, जनसंपर्क अधिकारी, सोलापूर विभाग
रेल्वेने सर्वसाधारण वर्गाची अनारक्षित तिकीट विक्री बंद केली आहे असेच नाही तर करोना कालावधीपूर्वी सुरू असलेल्या अनेक पॅसेंजर गाडय़ा करोना कालावधीत बंद केल्या. अद्याप त्या पुन्हा सुरू केलेल्या नाहीत. याशिवाय महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी आरक्षित तिकिटामध्ये ५० टक्के सवलत दिली जात होती, तीही बंद केली आहे. तसेच काही जलदगती गाडय़ांतील आरक्षित तिकीट संख्याही कमी केली आहे. हा करोनानंतरचा झटका रेल्वेने प्रवाशांना दिला आहे. अनारक्षित तिकीट विक्री सुरू केल्यास विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्याही कमी होईल.
– हरजितसिंग वधवा, माजी सदस्य, रेल्वे विभागीय सल्लागार समिती, नगर