बीड – राज्य सरकारला झुंडशाहीची भाषा कळते म्हणून झुंडशाही दाखवण्यासाठी ओबीसी संघर्ष यात्रा काढणार असल्याचे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बीडमध्ये आयोजित बैठकी दरम्यान सांगितले. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनासाठी लोकप्रतिनिधींनी दहा लाख रुपयांची देणगी दिल्याचा आरोप केला. बीडमध्ये आज ओबीसींच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन प्राध्यापक लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.
बीडमध्ये आज ओबीसींच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. मात्र, या बैठकीला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना लक्ष्मण हाके यांनी महाराष्ट्र सरकारला झुंडशाहीची भाषा कळते. त्यामुळेही आम्ही ओबीसी संघर्ष यात्रा काढणार आहोत, असे हाके म्हणाले.
यावेळी पुढे बोलताना लक्ष्मण हाके यांनी लोकप्रतिनिधींनी मनोज जरांगे सारख्या खुळचट माणसाला आंदोलनासाठी दहा -दहा लाख रुपयांचा निधी दिला असल्याचा आरोप केला. एकीकडे शरद पवार मंडल आयोगाच्या नावाने भामटेगिरी करत असून जरांगेंना उचकावत आहेत आणि दुसरीकडे मंडल यात्रा काढत आहेत, असेही हाके म्हणाले.
बीडमधील बैठकीला अल्प प्रतिसाद
दोन दिवसांपूर्वी लक्ष्मण हाके यांचा माळी समाजाबद्दल वक्तव्य करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमावर पसरला होता. त्यानंतर ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. आज लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे बैठकीसाठी एकाच मंचावर होते. मात्र बीडमधील या तातडीच्या बैठकीला अल्प प्रतिसाद मिळाला.