हिंगोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या तोंडावर महाविकास आघाडीला हिंगोली जिल्ह्यात गळती लागली आहे. मात्र, ‘नेते गेले म्हणजे लोकं जात नसतात, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी भवनामध्ये शनिवारी पदाधिकार्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
काही मंडळी पक्षातून बाहेर पडल्यामुळे नव्याने पदाधिकाऱ्यांची निवड, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीत एकत्रित लढवाव्यात की स्वतंत्र, या बाबीवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पक्षातून नेते कार्यकर्ते गेल्याने पक्षाचे नुकसान झाले. पण नेते गेले म्हणजे लोकं जात नसतात. थोडा संघर्ष करायला हवा होता. कधीकाळी नेत्यांबरोबर लोकं होती. परंतु, सध्याचे निवडणुकांचे वास्तव पाहिले तर नेते निवडून कसे येतात, हेच कळत नाही.
तसेच पक्षांतर केलेल्या नेत्यांबरोबर पाचशे, हजार मतदार गेले असा मी त्याचा अर्थ काढत नाही. महाराष्ट्रात आज तहाचे आणि तडजोडीचे राजकारण सुरू आहे. सत्तेत जे पक्ष आहेत त्यांच्याकडे जायचे पूर्वी असे नव्हते, लोक तत्ववादी होते, लढाई वैयक्तिक नव्हती तर विचारांची होती. आज वैयक्तिक विचार सुरू झाल्यामुळे इकडून तिकडे तिकडून इकडे असे प्रकार सुरू असल्याचे दांडेगावकर म्हणाले.
साधनांच्या जोरावर निवडणुका
पूर्वी काम आणि विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जायच्या. आता मात्र इतर साधनांच्या जोरावर निवडणुका जिंकल्या जात आहेत. जो उमेदवार साधनांच्या जोरावर निवडून येतो त्या उमेदवाराला पुढचे पाच वर्षे जनतेची कड राहत नसल्याचे श्री. दांडेगावकर म्हणाले. महाविकास आघाडीला विधानसभेत सुद्धा लोकांनी नाकारलं नाही. महाराष्ट्रात काही विपरीत घडलं आणि हे सगळे निकाल आले. मी लढविलेल्या सहा निवडणुकांपैकी सहाव्या निवडणुकीत लोकांचा सर्वांत जास्त प्रतिसाद होता पण मशिनेश्वरी प्रसन्न झाली, असे दांडेगावकर म्हणाले.