सातारा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची प्रतीक्षा आज सोमवारी संपली. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. मंत्रालयात या विभागाच्या मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत पार पडली.

सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांपैकी पाचगणी आणि मलकापूर नगरपरिषदांना अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण आरक्षण मिळाले आहे. तर सातारा, कराड, वाई, फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदांसाठी खुला प्रवर्ग, तसेच म्हसवड आणि रहिमतपूर नगरपरिषदांसाठी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित झाले आहे. जिल्ह्यातील सात पालिकांत सर्वसाधारण खुल्या गटातून जनतेचा नगराध्यक्ष होणार आहे. याशिवाय, मेढा नगरपंचायतीसाठी खुला प्रवर्ग जाहीर झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जानेवारीअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या आरक्षणामुळे राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला असून उमेदवार निवडीची नवी समीकरणे मांडली जात आहेत. अनेक पालिकांमध्ये सर्वसाधारण नगराध्यक्ष आरक्षण आल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ठरविताना जिल्ह्यातील नेतृत्वाची आता कसोटी लागणार आहे. या प्रवर्गातून अनेक जण इच्छुक आहेत. त्यांनी यासाठी आत्तापासूनच संपर्काला सुरुवात केली आहे.

सर्वसाधारण प्रवर्गातील आरक्षण जाहीर होताच जिल्ह्यात अनेक ठिकाणी फटाके फोडून इच्छुकांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. आपल्या शहराचे नगराध्यक्षपद कोणत्या प्रवर्गाकडे जाईल, याकडे लोकप्रतिनिधी आणि संभाव्य उमेदवारांचे डोळे लागले होते. या आरक्षणामुळे आता अनेक ठिकाणी राजकीय गणित बदलण्याची चिन्हे स्पष्ट झाली असून, कोणत्या पक्षाला याचा लाभ किंवा तोटा होईल, हे आगामी निवडणुकीत ठरेल.

प्रभाग आरक्षणाकडे लक्ष?

पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. प्रभाग निश्चिती व मतदारयाद्या अंतिम झाल्यानंतर आता बुधवारी प्रभागनिहाय आरक्षण सोडत होणार आहे. ओबीसी आरक्षण आणि प्रभाग आराखड्याशी संबंधित याचिका निकाली लागल्यानंतर निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतींसाठी नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत सोमवारी मंत्रालयात पार पडली. त्यामुळे जिल्ह्यातील पालिकांमध्ये नगराध्यक्ष कोण असणार, कोणाच्या गळ्यामध्ये या नगराध्यक्षपदाची माळ पडणार याकडेच आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आता बुधवारी होणाऱ्या प्रभाग सोडतीकडे साताऱ्यासह जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.