अहिल्यानगर : जिल्ह्यातील ११ नगर परिषदा व १ नगरपंचायत अशा १२ पालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक कार्यकर्त्यांची असली, तरी पाठबळ निर्माण करण्यासाठी नेत्यांचा कस लागणार आहेच. राज्यातील सत्ताधारी महायुतीपुढे जिल्ह्यात एकसंघ राहण्यासाठी संघर्षाची, पर्यायाने बंडखोरी होण्याची चिन्हे अधिक आहेत. त्या तुलनेत महाविकास आघाडी एकसंघ असली, तरी तिला अस्तित्वासाठी धडपडावे लागणार आहे.
नगराध्यक्षपद जनतेतून निवडले जाणार असल्याने अनेक ठिकाणी या पदाचा उमेदवार कळीचा मुद्दा ठरणार आहे. नेवासे नगरपंचायतीसह संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, राहुरी, पाथर्डी, शेवगाव, जामखेड व श्रीगोंदा या नगर परिषदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निमशहरी भागातील या निवडणुका गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या होत्या.
संगमनेर पालिकेवर यापूर्वी काँग्रेसचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे एकहाती वर्चस्व होते. आता तेथे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) अमोल खताळ आमदार झाले असले, तरी प्रत्यक्षात थोरात विरुद्ध विखे अशीच लढत होणार आहे.
कोपरगावमध्ये महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) आमदार आशुतोष काळे व भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे एकत्र येणार की स्वतंत्र लढणार, हा जटिल प्रश्न आहे. राहात्यामध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे वर्चस्व असले, तरी भाजपमधीलच त्यांचे विरोधक डॉ. राजेंद्र पिपाडा कोणती भूमिका घेतात, याकडेही लक्ष राहणार आहे. शिर्डीमध्ये विखे विरुद्ध इतर सर्व अशी परिस्थिती आहे.
श्रीरामपूरमध्ये महायुतीतील राधाकृष्ण विखे-भानुदास मुरकुटे-अविनाश आदिक-लहू कानडे एकत्र राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. नगराध्यक्षपद हा कळीचा मुद्दा ठरेल. त्याच्या उमेदवारीसाठी बदलाचे वारे वाहत आहेत. दोन दिवसांपूर्वी अजित पवार गटाला काँग्रेसने झटका दिला. आमदार हेमंत ओगले यांच्यामुळे ससाणे गटाचे बळ वाढले आहे.
देवळाली प्रवरामध्ये भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे वर्चस्व आहे. राहुरीत सातत्याने शरद पवार गटाचे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्याकडे सत्ता राहिली. आता त्यांचे बंधू अरुण तनपुरे अजित पवार गटाकडे गेले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे विखे यांना राहुरीमध्ये लक्ष घालावे लागणार आहे.
पाथर्डीत भाजप आमदार मोनिका राजळे यांचे वर्चस्व आहे. तेथे शरद पवार गटाचे प्रताप ढाकणे संदिग्ध अवस्थेत आहेत. महायुतीतील अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले व भाजपच्या आमदार राजळे यांच्यामध्ये सख्ख्य नाही. शेवगावमध्ये घुले यांचे वर्चस्व आहे, महायुतीतील राजळे गट तेथे विरोधात असेल.
श्रीगोंद्यात भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या विरोधात यांचे विरोधक अजित पवार गटात एकत्र आले आहेत. त्यामुळे महायुतीमधील घटक पक्ष तेथे एकमेकांच्या विरोधात झुंजतील. जामखेडमधील सत्ता कधी सभापती राम शिंदे, तर कधी आमदार रोहित पवार यांच्याकडे हस्तांतरित झाली. त्यामुळे तेथे पुन्हा शिंदे विरुद्ध पवार अशीच लढत होणार आहे. नेवासामध्ये ठाकरे गटाचे माजी मंत्री शंकरराव गडाख विरुद्ध इतर सर्व अशी लढत होईल.
