पाय थिरकायला लावणारे बँडचे साहित्य गेल्या महिनाभरापासून धूळखात पडले आहे. अनेकांच्या नवआयुष्याचा प्रारंभ ताला-सुरात करणारे बँड पथकातील कलाकार सध्या मोठ्या पेचात सापडले आहेत. ऐन लगीन सराईत करोनाचं संकट उदभवलं, अनेक कार्यक्रमांची सुपारी रद्द झाली. वर्षभराची गोळाबेरीज विस्कळीत झाली. कुटुंबावर तर सध्या उपासमारीची वेळ येऊन ठेपली. आपल्या पथकातील कलाकारांचा चेहरासुद्धा बघवत नसल्याची प्रतिक्रिया वर्षी तालुक्यातील पारगावाच्या पथकाचे प्रमुख सुजित औताने यांनी दिली आहे.

बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सीमेवर पारगाव आहे. येथील सुजित बॅंड पथक राज्यात नावाजलेले पथक आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत या पथकाला आवर्जून आमंत्रित केले जाते. एरवी या कालावधीत एकही तारीख शिल्लक नसलेल्या या पथकातील साहित्यावर सध्या धूळ साचली आहे. पथकात ३० पेक्षा अधिक कलाकार आहेत. प्रत्येकाची कला ठेका धरायला भाग पाडणारी आहे. या प्रत्येक कलाकारामागे कुटुंबात सरासरी पाचजण अवलंबित आहेत. काम नाही त्यामुळे पथकातील सर्वांच्या चेहऱ्यावर अवकळा पसरली आहे. स्वतःसह अवलंबून असलेल्या कुटुंबातील सर्वांवरच उपासमारीची वेळ आली आहे आणि समोर पर्याय काहीच दिसत नाहीत अशी हतबलता सर्वांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत आहे.

आणखी वाचा- Lockdown: शेतमजुरांच्या दारात कोर्ट; मदतीसाठी न्यायाधीशांचा पुढाकार

वाशी तालुक्यातील पारगाव येथील सुजित बँड पथकाप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यात लहान मोठे किमान ८० पथक आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या हजाराहुन अधिक असेल अशी माहिती सुजित औताने यांनी दिली. या सर्व पथकांमधील कलाकारांवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबीयांची संख्या देखील हजारोच्या घरात आहे. अचानक उद्भवलेल्या अशा काळात या बॅंड कला जिवंत ठेवण्यासाठी हे कलाकार जगविण्याचे मोठे आव्हान पथक प्रमुखांसमोर उभे आहे. उन्हाळ्यात लग्न समारंभ, उरूस, जत्रा अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते आणि त्यासाठी बॅंड पथक हे समीकरण आता रूढ झाले आहे. मधल्या काळात डॉल्बीवर निर्बंध आल्यामुळे बॅंड पथकाला बरे दिवस आले आहेत. त्यात यंदा कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले आहे.

पथकात कामं करण्यासाठी नवीन कलाकार याच काळात तयार होतात. लोकांना थिरकायला लावणारी कोणती गाणी वाजवायची त्याचा सराव याच कालावधीत केला जातो. सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश असल्यामुळे नवीन कलाकार तयार होण्याची प्रक्रियाच थांबली आहे. चालू हंगामातील उत्पन्नावर पुढील वर्षभराचे नियोजन केले जाते. संपूर्ण हंगाम उत्पन्नाविना त्यामुळे वर्षभर खायचे काय? हा प्रश्न अनेकांना सतावत आहे. पोरीबळींचे लग्न, मुलांचे शिक्षण या प्रश्नांमुळे तर अनेकांची झोप उडाली आहे.

आणखी वाचा- लॉकडाउनचा फटका, बीडमधील शेतकऱ्यानं तीन एकरातील झेंडू उपटून फेकला

किमान आर्थिक मदत मिळावी – औताने

माझ्याकडील पथकात ३० पेक्षा अधिक कलाकार आहेत. त्या प्रत्येकाच्या कुटुंबात सरासरी ४ ते ५ सदस्य अवलंबून आहेत. यंदाचा हंगाम असाच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. एरव्ही चकाकत असलेली आमची वाद्ये धूळखात पडली आहेत. पुढील वर्ष कसे काढायचे या विवंचनेने आम्हाला ग्रासले आहे. राज्य सरकारने आमच्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची दखल घेऊन किमान आर्थिक मदत देऊन बँड पथकातील कलाकारांचे पुढील वर्षभराचे जगणे सुसह्य करावे अशी मागणी बँडपथकाचे प्रमुख सुजित औताने यांनी केली आहे.