सावंतवाडी : कर्नाटकातील दांडेली अभयारण्यातून सुमारे २२ वर्षांपूर्वी आलेल्या हत्तींच्या कळपाने गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील सीमेलगतचा शेती व्यवसाय संकटात आणला आहे. याच कळपातील १०-१२ वर्षांचा ओंकार नावाचा हत्ती आता एकटाच चिंतेचे कारण बनू लागला आहे. सिंधुदुर्गात एका वृद्धाला चिरडल्यानंतर गेले १५ दिवस गोव्यातील शेतांचे नुकसान करणारा हा हत्ती आता पुन्हा महाराष्ट्रात परतला आहे. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी आता महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यांनी एकत्रित योजना आखली आहे.
राज्यात वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे दर वर्षी १० ते ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होत असल्याचा अहवाल गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतील शाश्वत विकास केंद्राने नुकताच दिला आहे. ‘ओंकार’ हे त्याचे ताजे उदाहरण आहे. महाराष्ट्रात सध्या एकूण आठ हत्तींचा वावर आहे. यात सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यात सहा (ओंकारसह) तर कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात दोन हत्ती आहेत. हे सर्व हत्ती कर्नाटक राज्यातील दांडेली अभयारण्यातून आलेले आहेत. मात्र ओंकार हत्ती १० ते १२ वर्षांचा असल्याने त्याचा जन्म दोडामार्ग तालुक्यातील असावा असा वन विभागाचा अंदाज आहे. कळपापासून वेगळा झालेला हा हत्ती गेल्या काही आठवड्यांपासून त्रासदायक ठरू लागला आहे. त्याने दोडामार्ग येथील एका ७० वर्षीय वृद्धाला चिरडल्यानंतर प्रशासनाने त्याला पकडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अतिवृष्टीमुळे हे शक्य झाले नाही.
तद्नंतर १३ सप्टेंबर रोजी त्याने गोव्यात प्रवेश केला आणि २७ सप्टेंबरपर्यंत १४ दिवस तो गोवा राज्यात होता. गोव्यातील तांबोसे, तोरसे, मोपा आणि पेडण्याच्या दिशेने त्याने आपला मुक्काम वाढवला. या १४ दिवसांत ‘ओंकार’ने उत्तर गोव्यातील मोपा, कडशी मोपा, तोरसे आणि तांबोसे या भागांतील भातशेती आणि नारळाची झाडे मोडून काढत मोठे नुकसान केले. तेथून २८ सप्टेंबर रोजी तो सावंतवाडी तालुक्यातील कास, सातोसे परिसरात दाखल झाला आहे. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
सिंधुदुर्ग उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या ‘ओंकार’ महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या कास, सातोसे परिसरात वावरत आहे, जिथे तेरेखोल नदी आहे. त्यामुळे हा परिसर हत्तीला पकडण्यासाठी योग्य नाही. योग्य जागी पोहोचल्यावर त्याला पकडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले. ओंकारसह अन्य हत्तींनाही पकडून त्यांना कोल्हापूर येथील हत्ती कॅम्पात ठेवण्यात येणार असल्याचे शर्मा म्हणाले.

हत्तींचा उपद्रव
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असलेल्या दोडामार्ग तालुक्यातील मांगेली परिसरातून जंगली हत्तींचा कळप तिलारी वनक्षेत्रात दाखल झाला. त्यावेळी २० ते २२ हत्तींचा हा कळप होता. सुरुवातीला हा कळप जंगलीक्षेत्रातच वावरत असे. शेतांमध्ये क्वचितच हे हत्ती शिरत. या भागातील ग्रामस्थ हत्तींच्या पायांच्या ठशांची पूजाही करत. मात्र, नंतर हत्तींचे कळप अन्नाच्या शोधात शेतांत शिरून नासधूस करू लागले. विशेषत: दोडामार्ग तालुक्यातील शेती आणि फळबागांचे हत्तींच्या कळपामुळे मोठे नुकसान होत आहे. हत्तींच्या उपद्रवामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी वनविभाग आणि राज्य सरकारवर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला आहे.
‘ओंकार’ला पकडण्यासाठी मोहीम
ओंकारला पकडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. त्यासाठी वनकर्मचारी, पशूवैद्यक आणि पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. हत्तीवर लक्ष ठेवण्यासाठी ५० स्थानिक तरुणांनाही नेमण्यात आले आहे. या मोहिमेसाठी कर्नाटकातील कुमकी हत्तींसह (प्रशिक्षित हत्ती) तज्ञांना पाचारण करण्यात येणार आहे. तज्ञ मार्गदर्शन करून ‘ओंकार’ला शांत करतील आणि मग त्याला पकडण्याची योजना आहे.
शेतीचे नुकसान
मांगेलीतून आलेले हे हत्ती दोडामार्ग तालुक्यात स्थिरावले असून, त्यांचा वावर दोडामार्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात प्रामुख्याने दिसून येतो. हत्ती प्रामुख्याने नारळ, केळी, फणस, काजू बोंडे, आणि भेलडा माड यांसारख्या विविध फळबागांना लक्ष्य करत आहेत. भातशेतीचेही मोठे नुकसान त्यांच्यामुळे होत आहे. विशेषत: फणस आणि काजू बोंडे खाण्यासाठी हत्ती हंगामात थेट लोकवस्तीत घुसून बागायती उध्वस्त करत आहेत. २०२२ ते २०२५ या काळात हत्तींमुळे सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यात झालेले शेतीचे नुकसान झाल्याची नोंद आहे.
वनविभागाचे प्रयत्न
वनविभागाकडून हत्तींना लोकवस्तीतून पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. हत्तींना पळवून लावण्यासाठी फटाके वाजवले जातात. हत्ती फटाक्यांच्या आवाजाने बिथरतात यावर बोलताना उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी स्पष्ट केले की, “हत्ती फटाक्यांमुळे बिथरतो हे खरे आहे, पण तो लोकवस्तीमध्ये घुसून बागायतींचे नुकसान करत असताना मनुष्यावर हल्ला चढवण्याची भीती असते. म्हणूनच त्याला सुरक्षित अंतरावर पळवून लावण्यासाठी फटाक्यांचा वापर केला जातो.”