Maharashtra Government Anandacha Shidha Yojana News : गणेशोत्सवापाठोपाठ यंदा दिवाळीतही गोरगरीबांना आनंदाचा शिधा यंदा मिळणार नाही. त्यामुळे राज्यसरकारने ही योजना अघोषित पणे बंद केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण ही योजना नेमकी का बंद पडली त्यामागणी कारणांचा थोडक्यात आढावा.
योजनेमागचा उद्देश
गोरगरीबांना सण आनंदात साजरा करता यावे यासाठी मागील तीन वर्षांपासून आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली होती. सणासुदीच्या काळात १०० रुपयात विवीध जिन्नस उपलब्ध लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिले जात होते. यात साखर, चणाडाळ, तेल आणि रवा या चार घटकांचा समावेश असायचा. त्यामुळे सण उत्साहात साजरे करणे शक्य होत असे.
वितरणातील अडचणी
राज्य सरकार हे चार जिन्नस खरेदी करून नंतर ते वितरणासाठी पाठवत असे, योजने अंतर्गत प्राप्त होणारे चारही जिन्नस एकाच वेळी लाभार्थ्यांना वितरण करणे अपेक्षित होते. मात्र कधी साखर, तर कधी तेल वेळेत उपलब्ध होत नसे, त्यामुळे शिधा वितरणाचा वांरवार बोजवारा उडत होता. गणेशोत्सवातील शिधा नवरात्रीत वितरण करावा लागायचा. वेळेत आनंदाचा शिधा प्राप्त होत नसल्याने, लाभार्थी शिधा खरेदीकडे पाठ फिरवायचे, त्यामुळे धान्य वितरकांची मोठी अडचण व्हायची. त्यामुळे ही महत्वाकांक्षी योजना टीकेची धनी ठरत गेली. त्यामुळे आनंदाचा शिधा पाठवूच नका अशी मागणी रास्त भाव दुकानदार आणि जिल्हा पुरवठा विभागाकडून गेल्या वर्षी करण्यात आली होती. त्यामुळे राज्यसरकारच्या पुरवठा विभागाने ही योजना बंद केल्याची चर्चा सुरु आहे.
लाडकी बहिण योजनेचा फटका
दुसरीकडे लाडकी बहिण योजनेमुळे राज्यसरकारवरचा आर्थिक भार कमालीचा वाढला त्यामुळे इतर लोकप्रिय योजनांना कात्री लावण्याची वेळ आली आहे. पुरवठा विभागा मार्फत राबविल्या जाणाऱ्या शिवभोजन थाळी योजनेचे भवितव्यही निधी अभावी अडचणीत आले आहे. शिवभोजन थाळी केंद्रांची योजना कमालीची घटली आहे. अनुदान वेळेत मिळत नसल्याने अनेक केंद्र चालक केंद्र बंद करण्याच्या विचारात आहेत.
धान्य वितरकांची भूमिका
अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून धान्य वितरण करणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले. परंतु वरच्या पातळीवरील वितरण व्यवस्था आणि वाहतुक ठेकेदारांच्या नेमणुका यामध्ये कमालीचा गोंधळ होता. याचा फटका आनंदाचा शिधा योजनेला बसत होता. आनंदाचा शिधा कधीच वेळेत वितरणासाठी उपलब्ध होत नव्हता, आणि एकदा सण संपला की लाभार्थी शिधा खरेदीकडे पाठ फिरवत असतं, त्यामुळे हा शिधा वितरण करणे आव्हानात्मक ठरत असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जाते.
झाले काय…
हीबाब लक्षात घेऊन यावर्षी गणेशोत्सव आणि दिवाळीतही लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वितरीत न करण्याचा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे. राज्यसरकारने ही योजना बंद करण्याबाबत कुठलिही अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी योजनेसाठी निधी न देऊन योजना बंद करण्याची तजवीज करून ठेवली आहे.
अतिवृष्टीमुळे बाधित कुटुंबांना दिलासा नाही
मराठवाडा आणि सोलापूर मध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती आणि घरादारांना पूरांचा फटका बसला आहे. घरातील धान्याची भिजून नासाडी झाली आहे. अशा वेळी आनंदाचा शिधा हा मराठवाडा आणि सोलापूर मधील लोकांसाठी पुरवला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळी दहा दिवसांवर आली तरी शासनस्तरावर याबाबत कुठलीही हालचाल होत नसल्याने, अतिवृष्टी बाधितांना या योजनेचा दिलासा मिळणार नाही अशीच स्थिती आहे.