करोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात करोना काळात राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी 24 तास’च्या वृत्तानुसार, राज्य सरकारमधील एकूण १८ मंत्र्यांनी करोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले. या उपचारासाठी लागलेला लाखोंचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. गेली दोन वर्ष करोना काळात सर्वसामान्य उपचारासाठी वणवण फिरत असताना आणि राज्याची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना या १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील उपचारासाठी तब्बल १ कोटी ३९ लाख खर्च केले. पण हे उपचार सर्वसामान्यांच्या खर्चावर झाल्याने आता वाद निर्माण झाला आहे.

हे मंत्री कोण आहेत?

या १८ पैकी सर्वाधिक नऊ मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि त्यानंतर काँग्रेसचे सहा आणि शिवसेनेचे तीन मंत्री आहेत. महत्वाचं म्हणजे यामध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपेंचाही समावेश आहे. राजेश टोपेंच्या उपचारासांठी तब्बल ३४ लाखांचा खर्च आला असून हे पैसेही सरकारी तिजोरीतून भरण्यात आले आहेत.

राजेश टोपेंसहित यामध्ये ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (१७ लाख ६३ हजार), ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (१४ लाख ५६ हजार), महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (१२ लाख ५६ हजार), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (११ लाख ७६ हजार), अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (९ लाख ३ हजार ) पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार (८ लाख ७१ हजार), जलसंपदामंत्री जयंत पाटील (७ लाख ३० हजार), उद्योगमंत्री सुभाष देसाई (६ लाख ९७ हजार) आणि – परिवहनमंत्री अनिल परब (६ लाख ७९ हजार) यांचा समावेश आहे.

याशिवाय या यादीत अशोक चव्हाण, संजय बनसोडे, विजय वडेट्टीवार यांचाही समावेश आहे. त्यांनी दोन लाखांपर्यंत उपचार घेतले आहेत. तसंच आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांनी एक लाखापर्यंतचा खर्च केला आहे. तर राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ५० हजारांच्या आसपास उपचार घेतले आहेत.

कोणत्या रुग्णालयांमध्ये घेतले उपचार

बॉम्बे हॉस्पिटल (४१ लाख) , लिलावती हॉस्पिटल (२६ लाख), ब्रीच कँण्डी हॉस्पिटल (१५ लाख), जसलोक हॉस्पिटल (१४ लाख), फोर्टिस हॉस्पिटल (१२ लाख), अवंती हॉस्पिटल (७ लाख), ग्लोबल हॉस्पिटल (४ लाख), अनिदीप हॉस्पिटल (२ लाख)

भुजबळांची प्रतिक्रिया –

“मागील वर्षी मी दाखल झालो असेन तर ते करोनासाठी नव्हतं. पण करोना किंवा इतर कोणत्याही आजारासाठी सर्व आमदारांना सरकारने तशी सोय उपलब्ध करुन दिली असेल तर त्याचा फायदा लोक घेतात,” असं छगन भुजबळ प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत. तसंच यावेळी त्यांनी तुम्ही फक्त मंत्र्यांचं काढता, पण सर्व आमदारांचं काढलं तर त्यात भाजपा आणि इतर पक्षाचेही सापडतील असंही म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra government minister spends lakhs on treatment in private hospital during covid sgy
First published on: 21-04-2022 at 14:23 IST